जिल्ह्यात रात्री ८ ते सकाळी ७ पर्यंत संचारबंदी घोषित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:36 AM2021-04-04T04:36:54+5:302021-04-04T04:36:54+5:30
भंडारा : जिल्ह्यात दररोज कोरोना रुग्णसंख्येचा स्फोट होत असल्याने प्रशासनाने आता कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक ...
भंडारा : जिल्ह्यात दररोज कोरोना रुग्णसंख्येचा स्फोट होत असल्याने प्रशासनाने आता कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणुन जिल्ह्यात शनिवारपासून रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत रात्रकालीन संचारबंदी जिल्हाधिकाऱ्यांनी एका आदेशाने घोषित केली आहे.
भंडारा जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येने २० हजारांचा आकडा पार केला असुन दररोज रुग्णांची संख्या वाढत आहे. असे असतानाही नागरिक मात्र कोरोना संसर्ग नियमांचे पालन करताना दिसत नाही. रात्रीही अनेक जण भटकंती करताना दिसून येत आहेत. यावर उपाययोजना करण्यासाठी रात्री ७ नंतर संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्याचे आदेश गत आठवड्यात काढण्यात आले होते. याची अंमलबजावणी होत असताना आता शनिवारी जिल्हाधिकाऱ्यांनी नवीन आदेश निर्गमित केला आहे. या आदेशानुसार भंडारा जिल्ह्यात ३ एप्रिलपासून पुढील आदेशापर्यंत रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी घोषित केली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती, समूह, आस्थापना व इतर संस्थांवर भादंसं १८६० (४५) च्या कलम १९८ अन्वये कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
जिल्हा प्रशासन कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शनात कसोशीने प्रयत्न करीत आहेत. परंतु रुग्णांची संख्या वाढत आहे. या सर्व प्रकाराला नागरिकांचा बेजबाबदारपणा जबाबदार असल्याचे दिसून येत आहे. अनेक जण मास्क न लावता शहरात भटकंती करीत असल्याचे दिसून येते. गर्दीच्या ठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन केले जात नाही. अशा व्यक्तींवरही आता कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे. मास्क न वापरणाऱ्यांवर तर दुप्पट दंडाचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.