निवडणूक निकालाची उत्सुकता शिगेला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 12:49 AM2019-05-17T00:49:20+5:302019-05-17T00:49:39+5:30
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्यात पार पडलेल्या भंडारा- गोंदिया लोकसभा मतदार संघातून कोण निवडून येणार याची उत्सूकता शिगेला पोहचली आहे. मतमोजणी अवघ्या सहा दिवसांवर आली असून गावागावांत विजयावरुन दावे-प्रतिदावे सुरु आहेत. पक्ष कार्यकर्त्यांसह सर्व सामान्य नागरिकही आकडेमोड करण्यात सध्या व्यस्त आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्यात पार पडलेल्या भंडारा- गोंदिया लोकसभा मतदार संघातून कोण निवडून येणार याची उत्सूकता शिगेला पोहचली आहे. मतमोजणी अवघ्या सहा दिवसांवर आली असून गावागावांत विजयावरुन दावे-प्रतिदावे सुरु आहेत. पक्ष कार्यकर्त्यांसह सर्व सामान्य नागरिकही आकडेमोड करण्यात सध्या व्यस्त आहे. तब्बल ४२ दिवसांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर मतमोजणी होत असल्याने उमेदवारांच्या हृदयाचे ठोके वाढले आहे.
भंडारा - गोंदिया लोकसभा मतदार संघाची निवडणूक ११ एप्रिल रोजी पार पडली. ६८.२७ टक्के मतदारानी मतदानाचा हक्क बजावला. राष्ट्रवादीचे उमेदवार नाना पंचबुध्दे, भाजपाचे उमेदवार सुनील मेंढे, बसपाच्या उमेदवार विजया नंदुरकर यांच्यासह १४ उमेदवारांचे भाग्य यंत्रात बंद झाले. मतदानाच्या दिवसापासून विजयावर दावे-प्रतीदावे सुरु आहे. मात्र ठामपणे कोण विजयी होईल याचा अंदाज बांधणे राजकीय तज्ञांनाही कठीण झाले आहे.
गावागावांत जातीय समीकरण आणि कोणता उमेदवार कुठे अधिक चालला यावरुन काथ्यकुट केले जात आहे. विजयावरून अनेकांनी पैजाही लावल्या आहे. निवडणुकीत आपल्या पक्षाच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी सर्वशक्तीपणाला लावणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये विजयाचे समीकरण मांडण्यात मोठी चुरस दिसत आहे. बेरीज वजाबाकीच्या समीकरणातून कार्यकर्त्यांनी पक्षश्रेष्ठीकडे आपलाच उमेदवार विजयी होणारे असे गणीतही मांडले आहे.
भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात राष्टÑवादी आणि भाजपा यांच्यात थेट लढत झाली. दोनही पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते विजयाचे दावे करीत आहे. आता २३ मे रोजी निकाल जाहीर होणार आहे.
मतमोजणीला अवघे सहा दिवस शिल्लक राहिले आहे. त्यामुळे निवडणूक रिंगणात उमेदवार सोबतच विजयाचे समीकरण मांडणाºया कार्यकर्त्यांचे हृदयाचे ठोके वाढले आहे. प्रत्येकजण विजयाचे दावे करीत असले तरी ठामपणे कुणीही विजयाची खात्री देतांना दिसत नाही.
कोण किती मते घेणार?
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात ६८.२७ टक्के मतदान झाले. म्हणजे १२ लाख ३४ हजार ८९६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदारसंघात १४ उमेदवार रिंगणात होते. विजयासाठी उमेदवाराला जवळपास ४२ ते ४४ टक्के मत हवे आहेत. यावरुन विजयासाठी उमेदवाराला जवळपास साडेपाच लाख मते हवी आहेत. आता कोणता उमेदवार किती मते घेतो आणि कोण विजयी होतो, यासाठी २३ मेची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
अंदाज बांधणे कठीण
लोकसभा निवडणुकीत भंडारा-गोंदिया मतदार संघातून कोण विजयी होणार याचा अंदाज बांधणे सध्या तरी कठीण झाले आहे. दोन्ही पक्षाचे पाठीराखे आपला उमेदवार विजयी होईल असा दावा करीत असले तरी ठामपणे किती मताधिक्य राहिल हे मात्र कुणी सांगताना दिसत नाही.