एचआयव्हीबाधितांसाठी ‘त्यांची’ राज्यभरात सायकलभ्रमंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2017 12:50 AM2017-01-26T00:50:32+5:302017-01-26T00:50:32+5:30
एचआयव्हीबाधित अनाथ बालकांचे मुलभूत प्रश्न, शिक्षण, आरोग्य व पुनर्वसनावर जनजागृती करण्यासाठी ...
साकोली : एचआयव्हीबाधित अनाथ बालकांचे मुलभूत प्रश्न, शिक्षण, आरोग्य व पुनर्वसनावर जनजागृती करण्यासाठी होमिओपॅथीक अॅकेडमी आॅफ रिसर्च अँड चॅरिटीज या संस्थेचे अध्यक्ष डॉ.पवन चांडक यांनी ८५० किलोमिटरचा गुजरात, राजस्थान व महाराष्ट्र असा सायकल प्रवास पूर्ण केला. त्यांचे साकोली तालुक्यात ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले.
शासकीयस्तरावर महाराष्ट्रातील एचआयव्ही बाधित बालकांना एआरटी केंद्रात मोफत उपचार मिळतात. परंतु त्यांचे पुनर्वसन समाजातील हक्क, शिक्षण त्यांना मुख्य प्रवाहात आणणे व १८ वर्षे पूर्ण झाल्यावर रोजीरोटी व्यवसाय आदी प्रश्न गंभीर होत आहेत. १ डिसेंबर रोजी शासकीयस्तरावर जनजागृती फेरी निघतात. तरीदेखील महाराष्ट्रातील हजारो एचआयव्हीबाधीत बालकांच्या प्रश्नावर कायमस्वरूपी उपाय होणे गरजेचे आहे.
यासाठी माणसा माणसांशी संवाद व्हावा म्हणून डॉ.चांडक हे २०१३ पासून सायकलने जनजागृती करतात. आजवर डॉ. चांडक यांनी मुंबई ते कोकण, परभणी ते पणजी, विदर्भ, परभणी, पंढरपूर, पुणे, महाबळेश्वर असा सायकलने प्रवास केला. राजस्थान व गुजरात राज्यात होणारे कामगारांचे स्थलांतरण व ट्रकचालक महिनोंमहिने कुटुंबापासून दूर राहिल्यामुळे असुरक्षित लैंगिक संबंधाच्या शक्यतेमुळे होणारा प्रसार हे एचआयव्ही प्रसाराचे मुख्य कारण आहे. त्यामुळे या विषयावर जनजागृती व्हावी, सायकलच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धन व प्रदूषणमुक्तीचा संदेश देता यावा, यासाठी सूरत, बडोदा, अहमदाबाद, मेहसाना, पालनपूर, माऊंट आबू, गुरूशिखर, छिंदवाडा, हल्दी की घाटी, उदयपूर, चितोडगड किल्ला या भागात सायकलने प्रवास केला.
मुळचे परभणी येथील डॉ.पवन चांडक यांनी भंडारा व गोंदिया जिल्ह्यात भेट दिली. साकोलीला भेट दिली असता ते म्हणाले, परभणी येथील ७० एचआयव्हीबाधित अनाथ बालकांचे शिक्षण आरोग्य व पुनर्वसन या मूलभूत गरजांवर काम सुरु असल्याचे सांगितले. साकोली येथे पोलीस ठाण्यात आयोजित कार्यक्रमात पोलीस निरीक्षक गायकवाड यांनी डॉ.चांडक यांचा सत्कार केला. (तालुका प्रतिनिधी)