पोलीस उपनिरीक्षकाची दबंगगिरी
By admin | Published: July 30, 2015 12:47 AM2015-07-30T00:47:05+5:302015-07-30T00:47:05+5:30
पत्रकारांनी नोंदविला निषेध : प्रकरण ग्रा.पं. मतमोजणी केंद्रावरील
मोहाडी : तालुक्यातील १७ गट ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची मतमोजणी २७ जुलैला परमात्मा एक भवन मोहाडी येथे सुरू असताना पोलीस उपनिरीक्षक पुरूषोत्तम साखरे यांची दबंगगीरीचा अनुभव उमेदवार प्रतिनिधीसह वृत्तपत्र प्रतिनिधींना प्रत्यक्षात आला.
मतमोजणी केंद्राच्या प्रवेशद्वारावर पोलीस उपनिरीक्षक पुरूषोत्तम साखरे यांच्यासह पोलीस कर्मचारी कर्तव्यावर होते. मात्र मतमोजणी केंद्रात प्रवेश करणाऱ्या उमेदवार प्रतिनिधींची विशेष अंगझडती घेताना हे पोलीस उपनिरीक्षक महाशय थोडे जास्तच कडक धोरण अवलंबित होते. त्यामुळे अनेकांसोबत त्यांची बाचाबाचीही झाली. वृत्तपत्र प्रतिनिधीजवळ निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेले प्रवेशपत्र असताना सुद्धा त्यांनी काही वृत्तपत्र प्रतिनिधींनाही अडवले. प्रथम त्यांनी मतमोजणी सुरू होत आहे थोडा थांबा असे म्हटले.
आमचे काम कोणते आहे असे वार्ताहरांनी म्हटल्यावर तसेच मोहाडीचे पोलीस उपनिरीक्षक सुहास चौधरी आल्यावर वार्ताहरांना आत जाऊ दिले. मतमोजणी संपल्यानंतर काही वार्ताहर विजयी उमेदवारांची यादी घेण्यासाठी आत जात असताना पुन्हा त्यांना पोलीस उपनिरीक्षक पुरूषोत्तम साखरे यांनी अडविले व आत जावू दिले नाही. मग मतमोजणी प्रवेशपत्राचा अर्थ काय, असा प्रश्न वार्ताहरांनी केला असून पोलिसांच्या अशाच दबंगगीरीमुळे सामान्य जनता पोलिसाविरूद्ध जाते.
पोलिसांच्या या प्रकारच्या तानाशाही वृत्तीचा मोहाडी तालुका पत्रकार संघांचे विश्वनाथ भुजाडे, क्रिष्णा निमजे, यशवंत थोटे, सुनिल मेश्राम, सिराज शेख, गिरधर मोटघरे, सदाशिव ढेंगे इत्यादींनी निषेध नोंदविला आहे. (शहर प्रतिनिधी)