साकोली तालुक्यात रेती तस्कराची दादागिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:37 AM2021-02-11T04:37:34+5:302021-02-11T04:37:34+5:30
सोमवारी दुपारी सोनेगाव गेटजवळ महसूल विभागाच्या पथकाने एक रेतीचा ट्रक पकडला. त्यावेळी त्या ट्रक चालकावर रेतीची रॉयल्टी नव्हती म्हणून ...
सोमवारी दुपारी सोनेगाव गेटजवळ महसूल विभागाच्या पथकाने एक रेतीचा ट्रक पकडला. त्यावेळी त्या ट्रक चालकावर रेतीची रॉयल्टी नव्हती म्हणून महसूलच्या पथकाने सदर ट्रकच्या घटना स्थळाचा पंचनामा करून ट्रक तहसील कार्यालयात जमा करण्यासाठी ट्रक चालकाला सांगण्यात आले. मात्र, जोपर्यंत ट्रकमालक येत नाही तोपर्यंत ट्रक इथून हलवत नाही, असा पवित्रा ट्रक चालकाने घेतला. काही वेळातच ट्रकमालक तिथे आला. त्यानंतर ट्रक साकोलीच्या दिशेने निघाला. या ट्रकच्या मागे ट्रक मालकाची कार होती व त्यामागे महसूलच्या पथकाचे वाहन होते. मात्र, सदर ट्रकमालकाने आपली कार हळुवारपणे चालवत मागे असलेल्या पथकाच्या वाहनाला पुढे जाण्यासाठी रस्ता देत नव्हता. ट्रक वेगाने पळविण्यास सांगितले. समोर सदर ट्रकमधील रेती रस्त्याच्या कडेला खाली करण्यास सांगून ट्रक घेऊन चालक पळाला.
या घटनेची माहिती पथकाने तात्काळ तहसीलदार यांना दिली. ही माहिती मिळताच नायब तहसीलदार मडावी घटनास्थळावर पोहोचले. तोपर्यंत ट्रक तिथून पळाला होता. नायब तहसीलदार मडावी यांनी रेतीचा पंचनामा करून ट्रक नंबरसह सदर अहवाल तहसीलदार यांना पाठविला. ही घटना दिनांक ८ ची असून आतापर्यंत तहसील कार्यालयामार्फत अजूनपर्यंत कुठलीही कार्यवाही करण्यात आली, तर पोलिसात साधी तक्रारही करण्यात आली नाही. या घटनेची तक्रार जर पोलिसात झाली असती तर आतापर्यंत सदर ट्रक पोलिसांच्या ताब्यात आला असता. मात्र, महसूलच्या या दिरंगाईमुळे अवैध रेती तस्करांची दादागिरी दिवसेंदिवस वाढत आहे.