महामार्गावर दररोज वाहतूक कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2022 05:00 AM2022-05-29T05:00:00+5:302022-05-29T05:00:46+5:30
रात्री १० वाजतापासून सकाळी ६ वाजेपर्यंत डागडुजीचे काम सुरू असते. यादरम्यान वाहतूक एकेरी केली जाते. परिणामी वाहतुकीची कोंडी होते. रात्री वाहन काढणे कठीण होते. सकाळी १० वाजेपर्यंत वाहतूक कोंडी कायम असते. जिल्हा वाहतूक शाखा दररोज वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. मात्र, वाहतूक कोंडी सोडविताना त्यांच्याही नाकीनऊ येत आहेत. सकाळी भंडारा शहरात अवजड वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसून येतात.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या डागडुजीच्या कामाचा फटका वाहनधारकांना बसत असून गत दहा दिवसांपासून दररोज वाहतूक कोंडी होत आहे. दररोज सकाळी दोन्ही बाजूला वाहनांच्या पाच किलोमीटरपर्यंत रांगा लागत आहेत. वाहतूक सुरळीत करताना पोलिसांच्या नाकीनऊ येत असून सकाळी नोकरीनिमित्त जाणारे कर्मचारी, कामगार दोन ते तीन तास उशिरा कार्यालयात पोहोचत आहेत.
भंडारा शहरातून मुंबई-कोलकाता हा राष्ट्रीय महामार्ग जातो. बायपास नसल्याने संपूर्ण वाहतूक शहरातूनच होते. त्यातच वैनगंगा नदीवरील लहान पूल वाहतुकीसाठी बंद असल्याने संपूर्ण वाहतूक मोठ्या पुलावरून सुरू आहे. गत दहा दिवसांपासून राष्ट्रीय महामार्गाच्या पावसाळापूर्व डागडुजीच्या कामाला सुरुवात झाली आहे.
रात्री १० वाजतापासून सकाळी ६ वाजेपर्यंत डागडुजीचे काम सुरू असते. यादरम्यान वाहतूक एकेरी केली जाते. परिणामी वाहतुकीची कोंडी होते. रात्री वाहन काढणे कठीण होते. सकाळी १० वाजेपर्यंत वाहतूक कोंडी कायम असते. जिल्हा वाहतूक शाखा दररोज वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. मात्र, वाहतूक कोंडी सोडविताना त्यांच्याही नाकीनऊ येत आहेत. सकाळी भंडारा शहरात अवजड वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसून येतात.
या महामार्गावरून जाणाऱ्या वाहनधारकांना तासनतास खोळंबून रहावे लागते. सकाळी नोकरीनिमित्त भंडारा शहरात येणारे आणि साकोली व नागपूर येथे जाणारे कामगार आणि कर्मचारी त्रस्त झाले आहेत. कार्यालयात जाण्यासाठी सुमारे दोन तास उशीर होत असल्याचे कर्मचारी सांगत आहेत. वाहतूक कोंडीने सर्वच जण त्रस्त आहेत.
एसटीची बससेवा प्रभावित
- सतत होणाऱ्या वाहतूक कोंडीने एसटीची बससेवा प्रभावित झाली आहे. राष्ट्रीय महामार्गावर पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागतात. त्यात एसटी बसही खोळंबतात. राज्य परिवहन महामंडळाचे भंडारा विभागीय वाहतूक अधिकारी चंद्रकांत वडसकर म्हणाले, वाहतूक कोंडीमुळे भंडारा ते नागपूर मार्गावरील एसटी बसेस अर्धा ते एक तास उशिराने धावत आहेत. अनेक बसफेऱ्या प्रभावित झाल्या असून प्रवासी त्रस्त होत आहेत. महामंडळालाही आर्थिक फटका बसत आहे.
३० मेपर्यंत डागडुजीचे काम
- पावसाळापूर्व डागडुजीचे काम गत दहा दिवसांपासून राष्ट्रीय महामार्गावर सुरू आहे. ३० मेपर्यंत काम पूर्ण केले जाणार आहे. राष्ट्रीय महामार्गावर मुजबी ते कारधापर्यंत पडलेले खड्डे बुजविण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे वाहतूक एकेरी सुरू राहते. रात्रीच्यावेळी काम केले जात असले तरी दिवसभर वाहतूक संथगतीने सुरू असते.