साकोली, पवनी तालुक्यात दुबार पेरणीचे संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 10:28 PM2019-07-17T22:28:47+5:302019-07-17T22:29:04+5:30
तालुक्यात आतापर्यंत अत्यल्प पावसाची नोंद करण्यात आली. पावसाला सुरुवात होऊनही पुरेशा प्रमाणात पाऊस आलेला नाही. ओलिताखालील क्षेत्रात धानाची रोवणी झाली असली तरी रोवणी वाळत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली/पवनी : तालुक्यात आतापर्यंत अत्यल्प पावसाची नोंद करण्यात आली. पावसाला सुरुवात होऊनही पुरेशा प्रमाणात पाऊस आलेला नाही. ओलिताखालील क्षेत्रात धानाची रोवणी झाली असली तरी रोवणी वाळत आहे. तर कोरडवाहू शेतातील पऱ्हे करपले आहेत. एकंदरीत शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. मात्र पाऊस येईलच व दुबार पेरणी होईलच याचा नेम नाही.
गत पाच वर्षापासून पावसाचे प्रमाण कमी कमी होत चालले आहे. त्यामुळे शेतकरी आधीच दुष्काळाचा झळा शोषित असून कर्जबाजारी झाले आहेत. आधीचेच कर्ज फेडुन झाले नाही तर आता यावर्षी पुन्हा कर्ज काढले ते कधी फेडून होतील, अशी परिस्थिती शेतकऱ्यांवर आली आहे. यावर्षी ओलीताखाली असलेल्या शेतात शेतकऱ्यांनी कशीबशी रोवणी आटोपली. मात्र भारनियमनामुळे केवळ आठ तास वीज पुरवठा होत असल्याने पिकांना पाणी पुरेशा होत नाही. त्यामुळे रोवणीही वाळत आहे, तर दुसरीकडे कोरडवाहू जमीनीतील पऱ्हे करपले आहेत. एकंदरीत शेतकरी अडचणीत सापडला आहे.
हवामान खात्याचा अंदाज चुकला
यावर्षी वर्तविण्यात आलेले हवामान खात्याचे अंदाज सपशेल खोटे ठरले. रोहिणी नक्षत्रापासून पावसाळा सुरु होत असला तरी मृग, आद्रा व पुनर्वसू हे तिन्ही पाऊस पडणारे नक्षत्र मानुन बळीराजाने खरीप हंगामातील पेरणीला सुरुवात केली. आद्रा नक्षत्रात हलका पाऊस झाल्याने भातपिकाचे नियोजन करुन पऱ्हे टाकण्यात आले. आद्रानंतर पुनर्वसू कोरडा गेल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला. तिन्ही महत्वाचे नक्षत्र कोरडे गेल्याने बळीराजावर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे.
शेतमालाला भाव नाही, कर्जदारांकडून विमा सक्तिने वसूल करण्यात येते, निसर्ग साथ देत नाही अशा तिहेरी संकटात सापडलेल्या बळीराजाने अशा परिस्थितीचा सामना कसा करावा हा प्रश्न उभा ठाकला आहे.
ऋतू पावसाळा मात्र अनुभवायला मिळतो उन्हाळा. धानाचे नाजूक रोपटे प्रचंड तापमानामुळे करपू लागले आहेत. शेतातील विहिरींना, विंधन विहिरींना पाणी नाही. गोसीखुर्द धरणाचे पाणी अपूर्ण लघूकालव्या अभावी शेतापर्यंत पोहचू शकत नाही. अशा परिस्थितीत धानाचे पऱ्हे जगवायचे कसे असा प्रश्न उभा ठाकला आहे. पऱ्हे जगले नाही आणी पाऊस पडला तर दुबार पेरणीसाठी बियाणे कसे मिळणार असाही प्रश्न शेतकरी वर्गाला भेडसावत आहे.
भारनियमनात दुजाभाव
साकोली तालुक्यात कुठे आठ तास, तर कुठे बारा तास. कुठे २४ तासही विजपुरवठा मिळत आहे. त्यामुळे विज वितरण कंपनी शेतकऱ्यांशी दुजाभाव करीत असून शेतकऱ्यांवर अन्याय करीत आहे. हा भेदभाव बंद करावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
जलस्रोतांची पातळी खालावली
पावसाळा असुनही पाऊस आला नाही व शेतात सर्वत्र बोरवेलचे पाणी देणे सुरु आहे. त्यामुळे पाण्याच्या पातळीत कमालीची घट झाली असून शेतीला पाणी पुरत नाही.