बावनथडी प्रकल्पाच्या अतिरिक्त पाण्याने शेतीचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:33 AM2021-02-14T04:33:33+5:302021-02-14T04:33:33+5:30
करडी(पालोरा):- इंदूरखा कालव्याला बावनथडी प्रकल्पाचे पाणी अतिरिक्त सोडण्यात आल्याने महसुल साझा क्रमांक २६ मधील शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे अतोनात नुकसान ...
करडी(पालोरा):- इंदूरखा कालव्याला बावनथडी प्रकल्पाचे पाणी अतिरिक्त सोडण्यात आल्याने महसुल साझा क्रमांक २६ मधील शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. बेटाळा परिसरातील या नुकसानीस बावनथडी प्रकल्प कार्यालय जबाबदार असून प्रकरणी सखोल चौकशी व न्याय देण्याच्या मागणीसाठी जिल्हा परिषद माजी सदस्य सरिता चौरागडे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी उपोषणावर बसण्याचा इशारा दिला आहे.
बेटाळा परिसरातील शेतशिवारात मोठया प्रमाणात इंदूरखा कालव्याचे पाणी सोडण्यात आल्याने शेतशिवार जलमय झाले आहेत. शेतातील उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे. सन २००१ पासून इंदूरखा कालव्याचे काम बावथडी प्रकल्प कार्यालयाकडून पूर्ण करण्यात आलेले नाही. कालव्याच्या अपुर्णत्वास विभागाचे अधिकारी जबाबदार आहेत.
कालव्याच्या अपूर्ण कामामुळे बेटाळा परिसरातील खरीप व रब्बीचे पीक वारंवार नुकसानग्रस्त होत असल्याने शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आहे. शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी तयार करण्यात आलेला बावनथडी प्रकल्प अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे कर्दनकाळ ठरू पाहत आहे. अतिरिक्त पाणी सोडण्यात आल्याने झालेल्या नुकसानीची तात्काळ चौकशी करून शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी माजी जि.प. सदस्य सरीता चौरागडे व बेटाळा परिसरातील शेतकऱ्यांनी गिरोला येथील जलसंपदाविभागाचे अधिक्षक अभियंता सोनटक्के यांना निवेदनातून केली आहे. या प्रकरणी निवेदनाच्या प्रतिलिपी सर्व संबंधितांना देण्यात आल्या आहेत.
आंदोलक शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या
कृषी विभाग व महसुल विभागाचे वतीने शेतकऱ्यांच्या शेतीचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी. इंदूरखा कालव्याचे बांधकाम पूर्ण करण्यात यावे. जनावरांसाठी चाऱ्याची सोय करण्यात यावी, बेजबाबदारपणास कारणीभुत कार्यकारी अभियंता उजवा कालवा क्रमांक ५ व कार्यकारी अभियंता बावनथडी प्रकल्प श्रेणी १ बघेडा यांच्यावर व कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा.