अकाली पावसाने रब्बी पिकांची हानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:33 AM2021-03-24T04:33:22+5:302021-03-24T04:33:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क विरली (बु.): या परिसरात गत ४-५ दिवसांपासून दररोज हजेरी लावणाऱ्या अकाली पावसामुळे शेतात असलेल्या रब्बी पिकांच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
विरली (बु.): या परिसरात गत ४-५ दिवसांपासून दररोज हजेरी लावणाऱ्या अकाली पावसामुळे शेतात असलेल्या रब्बी पिकांच्या कडपा आणि जमा केलेल्या ढिगांमध्ये पाणी घुसले असून रब्बी पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. मंगळवारी दिवसभर पावसाने रिपरिप लावून उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पावसाळ्याचा अनुभव दिला. सद्यस्थितीत या परिसरात हरभरा , गहू आदी रब्बी पिकांच्या काढणीचा हंगाम जोमात सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात सदर पिकांच्या कडपा पसरलेल्या आहेत तर काही शेतकऱ्यांनी या पिकांचे ढीग जमा करून ठेवले होते. मात्र, गत ४-५ दिवसांपासून बरसणाऱ्या या पावसाने रब्बी पिकांची अतोनात हानी केली असून शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळविले आहे.
पावसाचे पाणी रब्बी पिकांच्या कडपा आणि ढिगांमध्ये घुसल्याने ही पिके अंकुरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचप्रमाणे शेतात उभे असलेले काढणी योग्य पिकेही धोक्यात आली आहेत. दरम्यान, शेतकरी जमा केलेल्या ढिगांवर ताडपत्री, पॉलिथीन वगैरे झाकून आपले पीक वाचविण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहे. खरीप हंगामात विविध रोग किडींचे आक्रमण, अतिवृष्टी आदी संकटामुळे धान पीक हातचे गेले. आता रब्बी पिकांवर शेतकऱ्यांची मदार असतांना निसर्गाने यावरही आपली वक्रदृष्टी फिरविली आहे. परिणामी शेतकऱ्यांवर कपाळावर हात मारण्याची वेळ आली आहे.