अतिवृष्टीने ८,३३२.२० हेक्टर क्षेत्रातील धान पिकांचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2024 12:26 PM2024-08-17T12:26:20+5:302024-08-17T12:27:35+5:30
Bhandara : नुकसानीअंतर्गत तालुक्यातील सुमारे ८१९ शेतकरी भरपाईसाठी पात्र
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखांदूर : गत २० ते २२ जुलैदरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील सुमारे ८ हजार ३३२.२० हेक्टर क्षेत्रातील आवत्या व रोवणी झालेल्या धानपिकाचे नुकसान झाल्याची माहिती आहे. ही माहिती स्थानिक लाखांदूर तालुका प्रशासनांतर्गत देण्यात आली आहे.
खरीप हंगामात दरवर्षी लाखांदूर तालुक्यातील जवळपास २८ हजार हेक्टर क्षेत्रात विविध खरीप पिकांची लागवड केली जाते. त्यामध्ये सर्वाधिक २५ हजार हेक्टर क्षेत्रात केवळ धान पिकाची लागवड केली जाते. उर्वरित क्षेत्रांत विविध खरीप पिकांची लागवड केली जाते. या लागवडीअंतर्गत यंदाच्या खरिपात गत काही महिन्यांत तालुक्यातील ५२३ हेक्टर क्षेत्रात आवत्या धानपिकाची लागवड करण्यात आली होती. उर्वरित क्षेत्रात मोठ्या प्रमाणात धान पिकाची रोवणी करण्यात आली होती.
धान पिकाची लागवड होऊन काही दिवस लोटत नाही तोच मागील २० जुलै ते २२ जुलैदरम्यान तालुक्यात सरासरी २४१.५ मिमी पाऊस पडला होता. हा पाऊस सरासरी अतिवृष्टीच्या तब्बल चौपट अधिक झाल्याने यंदाच्या खरिपात लागवडीखालील सर्व शेतपिके पाण्याखाली बुडाली होती.
पाण्याखाली बुडालेली पिके नष्ट झाल्याने नुकसानभरपाईची मागणी करण्यात आली होती. तालुका प्रशासनाने स्थानिक तलाठी कृषी सहाय्यक व ग्रामसेवक यांच्या संयुक्त नेतृत्वात अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतपिकांचे पंचनामे करण्यात आले होते. या पंचनाम्यानुसार स्थानिक लाखांदूर तालुक्यातील सुमारे ८ हजार ३३२.२० हेक्टर क्षेत्रातील धानपिकांचे नुकसान झाल्याची माहिती आहे.
१७ हजार १०८ शेतकऱ्यांना मिळणार भरपाई
अतिवृष्टीमुळे ८ हजार ३३२.२० हेक्टर क्षेत्रातील धान पिकांचे नुकसान झाले. या नुकसानीअंतर्गत तालुक्यात खरिपात कोरडवाहू क्षेत्रात लागवडीखालील आवत्या धानपिकाचे एकूण ५२३ हेक्टर क्षेत्रापैकी ३५२.४२ हेक्टर क्षेत्रातील धान पिकाचे नुकसान झाले. या नुकसानीअंतर्गत तालुक्यातील सुमारे ८१९ शेतकरी भरपाईसाठी पात्र ठरल्याची माहिती देण्यात आली आहे. या शेतकऱ्यांना शासननियमांनुसार प्रतिहेक्टर १३ हजार ६०० रुपयांप्रमाणे नुकसानभरपाई अपेक्षित आहे तर तालुक्यातील सिंचनयुक्त क्षेत्रांतर्गत सुमारे ७ हजार ९७९.७८ हेक्टर क्षेत्रातील रोवणी झालेल्या धानपिकाची नुकसान झाल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार तालुक्यातील सिंचन सुविधाधारक सुमारे १६ हजार २८९ शेतकऱ्यांना शासननियमानुसार प्रतिहेक्टर २७ हजार रुपयांप्रमाणे नुकसानभरपाई अपेक्षित आहे. एकंदरीत अतिवृष्टीमुळे लाखांदूर तालुक्यातील आवत्या व रोवणी अंतर्गत नुकसानग्रस्त सुमारे १७ हजार १०८ शेतकरी नुकसानभरपाईसाठी पात्र ठरले आहेत.