धरणाच्या साठवणूक पाण्यात वाढ; मदतीसाठी बपेऱ्यातील बळीराजाचा टाहो
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 14:35 IST2025-01-16T14:34:03+5:302025-01-16T14:35:58+5:30
बपेऱ्याचे शेतकरी नव्या संकटात : सर्वेक्षणानंतरही स्थिती 'जैसे थे'

Dam's storage water level rises; farmers in Bapera appeals for help
लोकमत न्यूज नेटवर्क
चुल्हाड (सिहोरा) : वैनगंगा नदीवरील कवलेवाडा धरणात पाण्याच्या साठवणूक क्षमतेत वाढ करण्यात आल्याने बपेरा गावातील शेतकऱ्यावर नवे संकट ओढवले आहेत. बागायती शेत बुडाले आहेत. धापेवाडा उपसा सिंचन योजना टप्पा २ अंतर्गत सर्वेक्षण करण्यात आले असले, तरी बुडीत शेतीची आर्थिक मदत मिळाली नसल्याची माहिती नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी दिली आहे.
धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्प आणि अदानी वीज प्रकल्पाला पाणीपुरवठा करण्यासाठी सिहोरा परिसरातून गेलेल्या वैनगंगा नदीवरील कवलेवाडा गावाचे शेजारी धरणाचे बांधकाम करण्यात आले आहे. धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्प १ आणि २ ला पाणीपुरवठा करण्यासाठी धरणात पाणी अडविण्यात येत आहे. धरणात पाणी अडविण्यात येणार असल्याने सिंचन प्रकल्पाने शेतकऱ्यांचे नद्यांचे काठालगत शेतशिवार करारबद्ध केले आहे.
मात्र सूचना दिली नाही
गावातील १२ शेतकऱ्यांनी मालकीच्या शेतात भाजीपाला उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, कवलेवाडा धरणात पाण्याचे साठवणूक क्षमतेत वाढ करण्यास सुरुवात करण्यात आली पण सूचना देण्यात आली नाही.
शेतशिवारात पाणी
वैनगंगा नदीचे पात्र तुडुंब भरले आहे. धरणाचे संपूर्ण दरवाजे बंद करण्यात आले आहेत. नदीचे पात्र तुडुंब भरल्याने बपेरा गावाच्या शेतशिवारात शिरल्याने भाजीपाला उत्पादनाचे पीक अक्षरशः बुडाले आहे.
१२ भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान
शेतकऱ्यांचे बागायत शेत बुडाले आहेत. गतवर्षीही अशीच अवस्था या शेतकऱ्यांची झाली होती. मात्र मदतीच्या अपेक्षेत असतानाही त्यांना न्याय मिळालेला नाही.
हे आहेत बुडीत शेतीचे शेतकरी
फटका बसलेल्या शेतकऱ्यांमध्ये हिरालाल उपरीकार, वासुदेव उपरीकार, महादेव उपरीकार, तिलकचंद राऊत, शोभाराम राऊत, गुहू आंबेकर, सुरेश जताळे, पुरुषोत्तम उपरीकार, दिलीप मुळे, अजय खंगार, विक्रम बोरघरे, नंदलाल बोरघरे यांचा समावेश आहे. पिकांची नुकसानभरपाई देण्याची जबाबदारी धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्प २ ची असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे.
"धरणात पाण्याच्या साठवणूक क्षमतेत वाढ करण्यात आल्याने बपेरा गावाच्या शेतशिवारात घेण्यात येणारे भाजीपाला उत्पादनाचे पीक बुडाले असून सडले आहेत. शेतशिवार धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्प २ सोबत करारबद्ध नाही. यामुळे नुकसाभरपाईची मागणी करण्यात आली आहे."
- हिरालाल उपरीकार, शेतकरी, बपेरा.