नवेगावबांध-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात वन्यप्राण्यांसाठी बंधारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:37 AM2021-05-27T04:37:14+5:302021-05-27T04:37:14+5:30

गोंदिया : उन्हाळ्याच्या दिवसात जंगलातील पाणवठे व पाण्याचे स्रोत कोरडे पडत असल्याने वन्यप्राणी पाण्याच्या शोधात गावाकडे धाव घेतात. ...

Dams for wildlife at Navegaonbandh-Nagzira Tiger Reserve | नवेगावबांध-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात वन्यप्राण्यांसाठी बंधारे

नवेगावबांध-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात वन्यप्राण्यांसाठी बंधारे

Next

गोंदिया : उन्हाळ्याच्या दिवसात जंगलातील पाणवठे व पाण्याचे स्रोत कोरडे पडत असल्याने वन्यप्राणी पाण्याच्या शोधात गावाकडे धाव घेतात. अशात वन्यप्राण्यांचा जीव धोक्यात येतो, तर बऱ्याचदा शिकारीचे प्रकारसुद्धा घडतात. या प्रकाराला आळा बसावा व वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती थांबावी यासाठी सेवा संस्थेतर्फे लाेकसहभागतून जांभळी वनपरिक्षेत्रात जंगलामध्ये १३ बंधारे तयार करून वन्यप्राण्यांची तृष्णा भागविण्याचा प्रयत्न करण्यात आला.

गोंदिया येथील सेवा संस्था मागील दहा वर्षांपासून वन्यजीव संरक्षण आणि संवर्धनाकरिता कार्य करीत आहे. नवेगावबांध-नागझिरा बफर झोन क्षेत्रात वन्यप्राण्यांचे संवर्धन करण्याचे कार्यसुद्धा सेवा संस्थेच्या माध्यमातून सुरू आहे. विदर्भातील व्याघ्र क्षेत्राचे एकात्मिक संगोपन आणि परिस्थितीकी विकास कार्यक्रमांतर्गत सडक अर्जुनी, उत्तर देवरी, गोरेगाव हे वनपरिक्षेत्र लागून आहे. याअंतर्गत जांभळी १ आणि जांभळी २ या बफर झाेन क्षेत्रात वन्यप्राण्यांसाठी १३ वनराई बंधारे तयार करण्यात आले आहेत. सेवा संस्थेने स्थानिक नागरिकांच्या मदतीने जंगलातील जुन्या बंधाऱ्यांमधील गाळाचा उपसा केला, तसेच वाहत्या नाल्यावर बंधारा तयार करून पाणी अडविण्यात आले. यामुळे पाणी अडवून वन्यप्राण्यांसाठी पाणी उपलब्ध करून देण्यास मदत झाली.

या बंधाऱ्यामुळे आता वन्यप्राण्यांना जून महिन्याच्या अखेरपर्यंत पाणी मिळण्यास मदत होणार आहे. सेवा संस्थेचे अध्यक्ष सावन बहेकार, चेतन जसानी, शशांक लाडेकर, अंकित ठाकूर, कन्हैया उदापुरे, दुष्यंत आकरे, अभिजित परिहार आदी सहकार्य करीत आहेत, तसेच स्थानिक स्तरावर हवन लटाये, नरेश मेंढे, विजय सोनवणे, संतोष कोरे, बादल मटाले यांचे सहकार्य मिळत आहे.

पाणवठ्यांवर संस्थेच्या सदस्यांची नजर

नवेगावबांध-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील बफर झोनमधील क्षेत्रात तयार करण्यात आलेल्या बंधाऱ्यामध्ये पाणी साचून राहावे, पाण्याच्या स्रोतावर त्याचा परिणाम होऊ नये, पाणवठ्यावर विषप्रयोग केला जाऊ नये, वन्यप्राण्यांच्या शिकारीच्या घटना घडू नयेत यासाठी सेवा संस्थेचे सदस्य पाणवठ्याच्या क्षेत्रात नजर ठेवून असतात. यामुळे वन्यप्राण्यांच्या शिकारीच्या घटनांना आळा घालण्यास मदत होत आहे.

टँकरने पाणीपुरवठा

उन्हाळ्यात पाणीटंचाईची समस्या आणि जंगलातील पाणवठे कोरडे पडत असल्याने सेवा संस्थेतर्फे स्वखर्चातून टँकरद्वारे पाणवठ्यामध्ये पाण्याची सोय केली जात आहे. यामुळे पाण्याच्या शोधात वन्यप्राण्यांची होणारी भटकंती थांबविण्यास मदत होत आहे.

Web Title: Dams for wildlife at Navegaonbandh-Nagzira Tiger Reserve

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.