तुमसर तालुक्यात १८४ विद्यार्थ्यांची दांडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:40 AM2021-08-13T04:40:13+5:302021-08-13T04:40:13+5:30
तुमसर : जवाहर नवोदय विद्यालय इयत्ता सहावीसाठी प्रवेश परीक्षा ही कोविडमुळे दोनदा बदलून तिसऱ्यांदा ११ ऑगस्टला देशातील सर्व ...
तुमसर : जवाहर नवोदय विद्यालय इयत्ता सहावीसाठी प्रवेश परीक्षा ही कोविडमुळे दोनदा बदलून तिसऱ्यांदा ११ ऑगस्टला देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात प्रवेश परीक्षा घेण्यात आल्या; मात्र एकट्या तुमसर तालुक्यातील ११९२ विद्यार्थ्यांपैकी चक्क १८४ विद्यार्थ्यांनी या परीक्षेला दांडी मारली असल्याचे उघड झाले आहे.
केंद्र शासनांतर्गत सुरू असलेल्या जवाहर नवोदय विद्यालयाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. विद्यालयाची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केल्यावरच विद्यार्थ्यांना विद्यालयात प्रवेश मिळतो व त्या विद्यार्थ्यांना सहावी ते बारावीपर्यंतचे सर्व शिक्षण आदी सुविधा मोफत दिली जाते. त्यामुळे आपल्याही पाल्याचा नवोदय विद्यालयात निवड व्हावी, या दृष्टिकोनातून प्रत्येक पालक पाल्याला खासगी शिकवणी आदी मार्गदर्शनातून त्यास जवाहर विद्यालय प्रवेशायोग्य बनविण्यास धावपळ करत असताना दिसतो. मग नेमके कोणते कारण ठरले की एकमेव तुमसर तालुक्यातून १८४ विद्यार्थ्यांची अनुपस्थिती राहणे, याची चाचपणी होणे गरजेचे आहे. ग्रामीण पालक हा आटापिटा करून आपल्या मुलांना शिक्षण देत आहे आणि ऐनवेळी मुलगा परीक्षा देऊ शकत नसेल तर याकडे शिक्षण विभागानेही गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.
कोविडचे कारण पुढे करून दोनदा परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आता कोविडचे तितके उद्रेक तर नाही आहे; परंतु डेंग्यू आदीची साथ सगळीकडे आहे. अशा वेळेत प्रवेश परीक्षा घेण्यापेक्षा ही साथ ओसरू दिल्यावर घेतल्या असत्या तर विद्यार्थ्यांची १०० टक्के उपस्थिती राहिली असती, असे काही पालकांचे मत आहे.
कोट:--
नवोदय प्रवेश परीक्षेला तुमसर तालुक्यात १८४ विद्यार्थी अनुपस्थित होते. हा आकडा मोठा आहे. अनुपस्थिती कारणमीमांसा पडताळून १२ ऑगस्ट रोजी झालेल्या स्कॉलरशिपच्या परीक्षेत वर्ग पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची अनुपस्थिती कमी करण्याचा शिक्षकांनी प्रयत्न केले आहे.
विजय आदमणे, गटशिक्षणाधिकारी, तुमसर.