विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात
By admin | Published: July 4, 2015 01:25 AM2015-07-04T01:25:40+5:302015-07-04T01:25:40+5:30
एकही मूल शिक्षणापासून वंचीत राहू नये यासाठी शासनाची धडपड सुरू आहे.
खातिया : एकही मूल शिक्षणापासून वंचीत राहू नये यासाठी शासनाची धडपड सुरू आहे. मात्र येथील जिल्हा परिषद शाळेतील चित्र बघितल्यास शासनाची ही उठाठेव फोल वाटते. कारण, जिर्ण अवस्थेत असलेल्या इमारतीत येथील विद्यार्थी जीव मुठीत धरून क,ख,ग चे धडे गिरवीत आहेत. जीवावरचा हा खेळ असूनही शिक्षण विभागाचे याकडे दुर्लक्ष असल्याने पालकांत मात्र रोष व्याप्त आहे.
मागील कित्येक वर्षांपासून येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेची जिर्ण अवस्था आहे. कौलारू इमारतींत येथील विद्यार्थी आपला जीव धोक्यात घालून शिक्षण घेत असल्याचे चित्र आहे. शिक्षण हक्काच्या नावावर शासन एकही मुल शिक्षणापासून वंचीत राहू नये म्हणत आहे. तर दुसरीकडे मात्र आहे त्या विद्यार्थ्यांना सुविधा पुरविण्यात शासन अपयशी ठरत असल्याचे हे मुर्त उदाहरण आहे. कोट्यवधी रूपये खर्च करून शासन विविध योजना राबवित आहेत. मात्र येथील विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून शिक्षण घ्यावे लागत असल्याचे चित्र मात्र त्यांच्या नजरेत येत नाही.
एकीकडे शाळेत बसण्यासाठी जागेचा अभाव आहे. त्यातही शाळेची इमारत कधी अंगावर पडेल याचा नेम नसल्याने विद्यार्थीच काय पालकही आपल्या पाल्यांना शाळेत पाठविण्यानंतर धास्तीत राहतात असे चित्र आहे. त्यात पावसाळ््यात तर अधिकच स्थिती गंभीर असते. पावसाचे पाणी वर्गांत गळत असल्याने विद्यार्थ्यांना बसणे कठिण होते.
शाळेच्या या अवस्थेबद्दल शिक्षण विभागाला कित्येकदा कळविण्यात आले आहे. मात्र शिक्षण विभाग डोळ्यावर हात धरून बसल्याने त्यांना येथील शाळेची दुरवस्था दिसत नाही. परिणामी आहे त्या स्थितीत जीव मुठीत धरून विद्यार्थी व शिक्षक शाळेत येत आहेत. शिक्षण विभागाच्या या पंगू कारभारामुळे पालकांत मात्र रोष व्याप्त आहे. सध्या पावसाळा सुरू असून पावसामुळे इमारत अधिक जिर्ण होऊन कधीही पडण्याची शक्यता टाळता येत नाही. अशात एखाद्याच्या जीवावर बेतण्याची वाट शिक्षण विभाग बघत आहे काय असा सवाल विद्यार्थ्यांच्या पालकांकडून उपस्थित केला जात आहे. शाळेच्या इमारतीची ही अवस्था बघता शाळेच्या नवीन इमारतीचे बांधकाम करण्यात यावे अशी मागणी पालकांकडून केली जात आहे. (वार्ताहर)