बंद जिल्हा परिषद शाळांत साप, विंचवांचा धोका; झाडे झुडूपेही वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:42 AM2021-09-17T04:42:19+5:302021-09-17T04:42:19+5:30
जिल्ह्यातील काही शाळा सुरू तर काही बंद आहेत. बंद शाळा जशाच्या तशा असून, त्या शाळांमध्ये आता उंदरांनी आपले घर ...
जिल्ह्यातील काही शाळा सुरू तर काही बंद आहेत. बंद शाळा जशाच्या तशा असून, त्या शाळांमध्ये आता उंदरांनी आपले घर केले आहे. त्या उंदरांना आपले भक्ष्य बनविण्यासाठी सापांनीही शाळेत जागा पकडली. साप आणि विंचवांचा वावर त्या शाळांमध्ये सुरू झाला. कंबरेएवढे गवत आणि कचरा शाळेच्या परिसरात जमा झाला. ज्या शाळेला आवारभिंत नाही किंवा आवारभिंत असूनही गेट नाही, अशा शाळेच्या आवारात त्या गावातील जनावरे येऊन चरत असतात. बंद असलेल्या जिल्हा परिषद शाळांत साप, विंचवांचा वावर वाढल्याने याचा धोका विद्यार्थ्यांना व शाळेच्या आवारात खेळणाऱ्या बालकांना आहे. त्यामुळे याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
वर्ग खोल्यांमधील धूळ हटेना
गत दोन वर्षांपासून शाळा बंद असल्याने विद्यार्थी घरीच आहेत. विद्यार्थ्यांनी मागील दोन वर्षांपासून आपल्या वर्ग खोल्या पाहिलेल्या नाहीत. त्या वर्गखोल्यांमध्ये आता धुळीचे साम्राज्य पसरले आहे.
वर्गातील डेस्क, बेंचवर मोठ्या प्रमाणात धूळ साचली आहे. शाळाच बंद असल्याने त्या शाळा स्वच्छ करण्याचा मानस कुणी ठेवला नाही. धूळ आणि वर्गात पसरलेले जाळे हे त्या वर्गखोल्यांची विदारक स्थिती आहे.
जबाबदारी कुणाची?
काही शाळेत साप, विंचवांनी पकडलेली जागा, याला शाळा प्रशासन जबाबदार असले तरी शाळेत असलेले परिचरपद शासनाने कमी केल्याने वर्गात जमलेली धूळ आता मुख्याध्यापकांनी स्वच्छ करावी का, हा प्रश्न उपस्थित होतो.
शाळेत साठलेला कचरा काढण्यासाठी किंवा बंद असलेल्या शाळा सुसज्ज करण्यासाठी शासनाने निधी दिलेला नाही. या शाळेची स्वच्छता करण्यापासून शाळेचे साहित्य निकामी झाले. दुरुस्ती करण्याचा भार मुख्याध्यापकांवरच टाकला जातो. मुख्याध्यापक शाळेला सजविण्यासाठी किती पैसे खर्च करणार काय? असा प्रश्न आहे.
इयत्ता ८ ते १२वीच्या ग्रामीण भागातील शाळा सुरू आहेत. परंतु काही वर्ग १ ते ७ च्या शाळा आजही बंद आहेत. विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू नसली तरी शाळा शिक्षकांसाठी सुरू आहेत.