वाघ दर्शनाने वाघिणीच्या दोन शावकांना धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:26 AM2021-05-28T04:26:00+5:302021-05-28T04:26:00+5:30
चिखला गाव परिसरात घनदाट जंगल आहे. या जंगलातील तलावात बुधवारी सायंकाळी नर वाघ पाण्याच्या शोधात आला होता. पाणी प्राशन ...
चिखला गाव परिसरात घनदाट जंगल आहे. या जंगलातील तलावात बुधवारी सायंकाळी नर वाघ पाण्याच्या शोधात आला होता. पाणी प्राशन केल्यानंतर हा वाघ जंगलाच्या दिशेने निघाला. या प्रसंगाचे काही युवकांनी चित्रीकरण केले. त्यामुळे परिसरात एकच खळबळ माजली. वन विभाग यामुळे अलर्ट झाला. आठ दिवसांपूर्वी चिखला येथील जंगल परिसरात एक वाघीण व तिची दोन शावके येथे दिसली होती. याची दखल वन विभागाने घेतली होती. आता त्याच परिसरात एक नर वाघ दिसल्याने वन विभाग खडबडून जागा झाला आहे.
जंगलात वाघ तसेच अन्य वन्यप्राण्यांचे दर्शन झाल्याने हे जंगल समृद्ध मानले जाते.
नाकाडोंगरी वनपरिक्षेत्राचा समृद्ध जंगलांमध्ये समावेश होतो. राज्याच्या शेवटच्या टोकावर असलेले जंगल अतिशय घनदाट आहे. या जंगलाच्या सीमेनंतर मध्यप्रदेशची सीमा सुरू होते. त्यामुळे वन्यप्राणी एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्याची शक्यता अधिक आहे. पाण्याच्या शोधात वन्यप्राणी अनेक किलोमीटरपर्यंत प्रवास करतात नर वाघ दिसल्याने तो बाहेरून आला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
बॉक्स
वाघांच्या लाेकेशनचा शोध
चिखला जंगलामधील दिसलेला नर वाघ व वाघीण तसेच तिच्या दोन शावकांचे वास्तव्य या परिसरात आहे. वैज्ञानिकदृष्ट्या नर वाघाचे हे शावक नसले तर त्या दोन शावकांना या वाघापासून मोठा धोका आहे. वाघाच्या दर्शनामुळे नाकाडोंगरी वन विभाग अलर्ट झाला असून, वाघीण तिच्या दोन शावकांच्या मागावर सध्या आहे. वाघाचे लोकेशन व त्या दोन शावकांचे सध्या लोकेशन कुठे आहे याचा सध्या शोध घेतला जात असल्याची माहिती आहे. त्या दोन शावकांच्या बचावाकरिता वन विभाग येथे पुढे सरसावला असल्याचे समजते.
कोट
व्हिडिओमधील वाघ हा चिखला जंगल परिसरात असलेल्या तलावातील आहे. याची दखल घेण्यात आली आहे. वाघीण, तिची दोन शावके व सध्या नर वाघाचे लोकेशन कुठे आहे याच्यावर आमची करडी नजर आहे.
नितेश धनविजय, वनपरिक्षेत्राधिकारी नाकाडोंगरी