कमकुवत आंतरराज्य पुलावरून धोकादायक वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:38 AM2021-09-21T04:38:51+5:302021-09-21T04:38:51+5:30
तुमसर ते कटंगी मार्गावर बावनथडी नदीवरील नाकाडोंगरी येथे पूल आहे. हा पूल एक वर्षापासून वाहतुकीसाठी बंद आहे. या ...
तुमसर ते कटंगी मार्गावर बावनथडी नदीवरील नाकाडोंगरी येथे पूल आहे. हा पूल एक वर्षापासून वाहतुकीसाठी बंद आहे. या पुलाला जड वाहतुकीमुळे हादरे बसतात. त्यामुळे खबरदारी म्हणून भंडारा जिल्हा प्रशासनाने या पुलावरून जड वाहतुकीस मनाई केली आहे. असे असताना बालाघाट येथील खासगी बसेस या कमकुवत पुलावरून सर्रास धावत आहेत. नागपूर येथे जाणाऱ्या प्रवाशांकडून जादा बस भाडे ते वसूल करत असल्याची माहिती आहे. राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या बस या मार्गावर बंद आहेत. परंतु खासगी बसगाड्या कशा धावतात, असा मुख्य प्रश्न उपस्थित होत आहे.
एक वर्षापासून हा पूल वाहतुकीस बंद करण्यात आला असला तरी अद्यापपर्यंत या पुलाची दुरुस्ती करण्यासाठी कोणतीही उपाययोजना प्रशासनाकडून करण्यात आलेले नाही. तुमसर तालुक्यातून मध्यप्रदेशातील कटंगी, सिवनी व बालाघाट येथे मोठ्या प्रमाणात प्रवासी ये-जा करतात. प्रवाशांना हा मार्ग सोयीचा व कमी वेळेचा आहे. जड वाहतूक बंद असल्यामुळे प्रवासी हे बपेरा या मार्गावरून ये-जा करतात. त्यामुळे आर्थिक फटका बसतो.
प्रशासनाने कमकुवत पुलावरून जड वाहतुकीस बंदी घातली असली तरी पुलाची दुरुस्ती तत्काळ करण्याची गरज आहे. यासंदर्भात प्रशासनाने श्वेतपत्रिका काढून या पुलाची दुरुस्ती केव्हा होईल, असे जाहीर करण्याची गरज आहे. खासगी बस गाड्यांची वाहतूक कमकुवत पुलावरून सुरू असल्याने अनेक प्रश्न येथे उपस्थित होत आहेत.