लाखांदूर तालुक्यातील २३ गावात अंधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:24 AM2021-06-24T04:24:30+5:302021-06-24T04:24:30+5:30
लाखांदूर तालुक्यात ६२ ग्रामपंचायती आणि एक नगरपंचायत आहे. त्याअंतर्गत १११ पथदिव्यांचे कनेक्शन आहेत. केवळ लाखांदूर नगरपंचायत क्षेत्रात आठ पथदिव्यांचे ...
लाखांदूर तालुक्यात ६२ ग्रामपंचायती आणि एक नगरपंचायत आहे. त्याअंतर्गत १११ पथदिव्यांचे कनेक्शन आहेत. केवळ लाखांदूर नगरपंचायत क्षेत्रात आठ पथदिव्यांचे कनेक्शन आहे. उर्वरित १०३ पथदिव्यांचे कनेक्शन ग्रामपंचायत क्षेत्रात आहेत. गत वर्षभरापासून ग्रामपंचायतींनी वीज बिलाचा भरणा केला नाही. ६२ ग्रामपंचायती अंतर्गत सुमारे एक कोटी रुपयांचे वीज बिल थकीत असल्याची माहिती आहे. याउलट नगरपंचायत क्षेत्रातील पथदिव्यांचे वीज बिल नियमित भरण्यात येते.
ग्रामपंचायतींनी पथदिव्यांचे वीज बिल भरले नाही. त्यामुळे २३ गावांतील पथदिव्यांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला. या ग्रामपंचायतींकडे २३ लाख ४७ हजार रुपये वीज बिल थकीत असल्याची माहिती आहे. काही वर्षांपासून ग्रामपंचायत क्षेत्रातील पथदिव्यांचा वीज बिल भरणा जिल्हा परिषदेकडून करण्यात येत होता. मात्र, मार्च २०२० पासून वीज बिल भरणा करण्यात आला नाही. त्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला. आता या गावांमध्ये अंधाराचे साम्राज्य पसरले आहे.
बॉक्स
पावसाळ्यात अंधाराचे सावट
ग्रामपंचायतीच्या पथदिव्यांचा वीज पुरवठा खंडित झाला. २३ गावांमध्ये अंधार पसरला आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. ग्रामीण भागात रस्त्यांची अवस्था दयनीय आहे. पावसामुळे चिखलाचे साम्राज्य असते. अशावेळी अंधारातून मार्गक्रमण करणे मोठे कठीण होते. सरपटणारे विषारी प्राणीही रस्त्यावर येऊन नागरिकांना दंश करू शकतात. त्यामुळे तत्काळ पथदिव्यांचा वीज पुरवठा सुरू करावा, अशी मागणी आहे.