उर्समधून हिंदू-मुस्लीम एकतेचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 10:45 PM2017-09-16T22:45:31+5:302017-09-16T22:45:47+5:30
शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या हजरत औलिया चाँदशहा बुखारी (र.अ.) यांचा उर्स जल्लोषात साजरा करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
पवनी : शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या हजरत औलिया चाँदशहा बुखारी (र.अ.) यांचा उर्स जल्लोषात साजरा करण्यात आला. या उर्समधून पवनीत हिंदू-मुस्लीम बांधवांच्या एकतेचे दर्शन बघायला मिळाले.
दुसºया दिवशी चादर कार्यक्रमात आमदार अॅड. रामचंद्र अवसरे, माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे यांनीही यावेळी हजेरी लावून बाबांना फुले अर्पण करून आशीर्वाद घेतला. शुक्रवारला नमाज पठननंतर हजरत शहीद-ए-मिल्लत सय्यद ममरेज खाँ यांच्या दरगाह वरून संदल शहरातील मुख्य मार्गाने काढण्यात आली.
यामध्ये मुरीद व फकीर यांचा प्रामुख्याने समावेश होता. त्यावेळी ठिकठिकाणी चौकात मुरीद व फकीर यांनी तलवार, खंजीरचे वार आपल्या अंगावर करणे, सळई वा जाड तारा खुपसणे या सारखे थरारक प्रकार यावेळी केले.
मात्र, औलिया पीर परंपरेच्या करामतीमुळे रक्ताचा एकही थेंब निघाला नाही, हे यांचे वैशिष्ट्य. हा रातिफचा सोहळा ढोल ताशे, नगारे यांच्या वादनात मोठ्याा उत्साहात संपन्न झाला. सर्वधर्मीय लोक यावेळी सहभागी झाले होते. सायंकाळी ६ वाजता फुलांच्या चादरी अर्पण केल्या गेल्या व प्रमुख मान्यवाराना कमेटी तर्फे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
उर्स कमेटीच्या वतीने लंगरचे आयोजन करण्यात आले होते. यात हिंदु-मुस्लिम बांधवांकरिता पूर्ण गावाला व पाहुण्यांना भोजन दिले गेले, या कार्यक्रमानंतर पहाटेपर्यंत कव्वालीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. त्यास हजारो चाहत्यांची हजेरी होती.
समाजातील चाहत्यांनी मोठा जल्लोष केला होता. तिसºया दिवशी शनिवारला सकाळी कुल फातेहाच्या कार्यक्रमाने सांगता करण्यात आली. असा हा हजरत औलिया पीर चाँद शाह बुखारी (र.अ.) यांचा उर्स दरवर्षी प्रमाणे यंदाही हिंदू मुस्लिम बांधवांनी एकोप्याने साजरा केला. बरीचशी मंडळी राज्य व बाहेर राज्यातून खास उरूससाठी आले. कार्यक्रमासाठी ऊर्स कमेटीचे पदाधिकारी, सदस्य व ग्रामस्थांनी सहकार्य केले.