शिक्षण विभागातील डाटा आता संगणकीकृत

By admin | Published: July 7, 2015 12:37 AM2015-07-07T00:37:15+5:302015-07-07T00:37:15+5:30

शिक्षण विभागातील शाळा, शिक्षक, विद्यार्थी आणि संस्थांची माहिती कुणी मागितली तर आता वेळेवर धावपळ करण्याची...

Data from education department is now computerized | शिक्षण विभागातील डाटा आता संगणकीकृत

शिक्षण विभागातील डाटा आता संगणकीकृत

Next

मनुष्यबळ व वेळेची बचत : सरल नावाचे नवे साफ्टवेअर विकसित
भंडारा : शिक्षण विभागातील शाळा, शिक्षक, विद्यार्थी आणि संस्थांची माहिती कुणी मागितली तर आता वेळेवर धावपळ करण्याची गरज राहणार नाही. आता ही माहिती कायम संकलित ठेवण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. ही माहिती कायम संकलित करून ठेवण्यासाठी शिक्षण विभागाने 'सरल' नावाने नवीन सॉफ्टवेअर विकसित केले असून हा सरल उपाय शाळा, शिक्षक, विद्यार्थी आणि संस्थांची माहिती साठवून ठेवण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.
शैक्षणिक आणि प्रशासकीय नियोजनासाठी अनेकदा सांख्यिकीय माहितीची गरज असते. परंतु अशी माहिती संकलित नसल्याने ही माहिती गोळा करण्यासाठी शिक्षक, मुख्याध्यापकांना तसेच संबंधित विभागाला वेळेवर धावपळ करावी लागते. यात वेळ, पैसा आणि मनुष्यबळ वाया जाते, पयार्याने अध्ययन, अध्यापनावरही परिणाम होतो. केंद्र सरकारच्या युडायस प्रणालीनुसार दरवर्षी राज्यातील सर्व शाळांकडून माहिती संकलित केल्या जाते.
या माहितीच्या आधारे शिक्षण विभागाकरिता धोरणात्मक निर्णय घेणे, प्रभावी नियोजन करणे, आर्थिक तरतुदीचे नियोजन केले जाते. परंतु शाळांकडे अशी माहिती उपलब्ध राहत नाही. त्यामुळे ऐनवेळी माहिती गोळा करण्यासाठी शाळेतील शिक्षक आणि मुख्याध्यापकांचा गोंधळ उडतो. पयार्याने नव्याने माहिती गोळा करण्यासाठी शिक्षकांचा वेळ खर्ची जातो. त्यामुळे अध्ययन-अध्यापनावर परिणाम होतो.
पैसा, वेळेचाही अपव्यय होतो. शिवाय बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २00९ मधील कलम २७ नुसार शिक्षकांना जनगणना, आपत्कालीन परिस्थिती व निवडणुका वगळता अन्य अशैक्षणिक कामे देता येणार नाही, अशी तरतूद असल्याने शाळा, विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि संस्थांची माहिती संकलित करून कायम साठवून ठेवण्यासाठी 'सरल' (सिस्टिमॅटिक अँडमिनिस्ट्रेटिव्ह रीफॉर्म फार अचिव्हिंग लर्निंग बॉय स्टूडंट) या नावाने नवे सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले.
राष्ट्रीय सूचना व विज्ञान केंद्र पुणेद्वारे ही संगणक प्रणाली विकसित करण्यात आली असून राज्यातील प्रत्येक मान्यताप्राप्त शाळेची, त्या शाळेत कार्यरत मान्यताप्राप्त शिक्षकांची, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची, शाळेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची माहिती या प्रणालीद्वारे आॅनलाईन केली जाणार आहे. त्यामुळे जेव्हा-जेव्हा या माहितीची गरज पडेल, त्यावेळी ती सहज उपलब्ध होऊ शकेल. शिवाय ही माहिती संकलित करण्यासाठी लागणारे मनुष्यबळ, पैसा आणि वेळेचीही बचत होणार आहे.
संस्थेच्या माहितीमध्ये संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा तपशील, संस्थेच्या धर्मदाय कार्यालयाकडे नोंदणी केलेल्या प्रमाणपत्रांचा तपशील व संस्थेद्वारे चालविण्यात येणाऱ्या शाळांची संख्यात्मक माहिती या प्रणालीद्वारे आॅनलाईन करता येणार आहे.
शाळा विषयक माहितीमध्ये शाळा प्रकार, व्यवस्थापन, शाळा मान्यता, पत्ता, संपर्क व्यक्तीचे नाव, भ्रमणध्वनी, शाळा तपासणी, शाळांना मिळालेले अनुदान, त्याचा विनियोग, शाळेतील विविध प्रकारच्या समित्या, बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमातील तरतुदीची माहिती, सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन, मोफत साहित्याचा पुरवठा, शैक्षणिक व शालेय उपक्रम आदींची माहिती आॅनलाईन संकलित करता येणार आहे. यामुळे शाळेची सद्य:स्थिती समजणार असून त्यानुसार निकषावर आधारित शाळेच्या गरजा स्पष्ट होईल. शिवाय वर्गवार व विषयावर अध्यापनाची सद्य:स्थिती मुख्याध्यापक, पालकांना प्राप्त होणार आहे.
शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची त्यांच्या सेवेच्या सर्व तपशीलाची माहिती आॅनलाईन घेतली जाणार आहे. शिक्षकांची शैक्षणिक व्यावसायिक अर्हता, त्यांनी घेतलेले प्रशिक्षण, त्यांना मिळणाऱ्या सुविधा, वारस नोंदणीचा तपशील, शिकवित असलेले विषय, त्यांचा कार्यभार आदी माहिती संकलित करण्यात येणार असून यामुळे कर्मचाऱ्यांची अद्ययावत सेवापुस्तके आॅनलाईन उपलब्ध होतील. कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षण विषयक गरजा निश्चित करता येणार आहे. शाळेमध्ये मंजूर, कार्यरत व रिक्तपदांची माहिती सहज उपलब्ध होणार आहे.
विद्यार्थ्यांची माहिती आॅनलाईन करताना त्यांच्या वैद्यकीय तपासण्याबाबतच्या तपशीलासह अन्य संपूर्ण माहिती भरून घेतली जाणार आहे. विशेष म्हणजे यामुळे विद्यार्थ्यांचे प्रगतिपुस्तक आॅनलाईन होणार आहे. शिक्षकांना वेगळे प्रगतिपुस्तक ठेवण्याची गरज भासणार नाही. (शहर प्रतिनिधी)

यांच्याकडे असेल जबाबदारी
ही माहिती संकलित करण्याची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. संस्था, मुख्याध्यापक, वर्गशिक्षक आणि गटशिक्षणाधिकारी ही माहिती संकलित करतील तर केंद्रप्रमुख किंवा शिक्षणाधिकारी ही माहिती अंतिम करतील आणि शिक्षण उपसंचालक किंवा गटशिक्षणाधिकारी या माहितीची पडताळणी करतील. यासाठी संबंधितांना स्वतंत्र लॉगीन आयडी आणि पासवर्ड दिला जाणार आहे. त्यामुळे ही माहिती संपूर्णपणे गोपनीय राहणार आहे.

Web Title: Data from education department is now computerized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.