वडिलांच्या न्यायासाठी मुलीचे उपोषण
By admin | Published: June 1, 2017 12:30 AM2017-06-01T00:30:15+5:302017-06-01T00:30:15+5:30
पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांच्या दडपशाही धोरणामुळे वडसा येथे कार्यरत असलेले शाखा अभियंता देवनाथ नंदनवार यांना २२ महिन्यांपासून वेतन मिळाले नाही.
प्रकरण पाटबंधारे विभागाचे : नंदनवार कुटुंबीयांनी पुकारला प्रशासनाविरुध्द एल्गार
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांच्या दडपशाही धोरणामुळे वडसा येथे कार्यरत असलेले शाखा अभियंता देवनाथ नंदनवार यांना २२ महिन्यांपासून वेतन मिळाले नाही. याबाबत त्यांनी वेळोवेळी वरिष्ठांना पत्रव्यवहार केला. मात्र दखल घेतली नाही. त्यामुळे नंदनवार यांनी आज बुधवारपासून भंडारा सिंचन मंडळ कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले आहे. वडिलांना न्याय मिळावा यासाठी त्यांच्या दहा वर्षीय चिमुकलीनेही उपोषण सुरु केले आहे.
इडियाडोह पाटबंधारे व्यवस्थापन उपविभागीय वडसा येथे शाखा अभियंता म्हणून कार्यरत असलेले देवनाथ नंदनवार यांच्यावर विभागीय अधिकारी टी. के. मेंढे, कार्यकारी अभियंता एच. वाय. छप्परघरे यांनी वेळोवेळी अन्याय केल्याची ३२४ पानांची तक्रार नंदनवार यांनी वरिष्ठांना केली आहे. या उपरांतही त्यांना न्याय मिळाला नाही. आॅगस्ट २०१४ ते नोव्हेंबर २०१४, आॅगस्ट २०१५ ते डिसेंबर २०१५, फरवरी २०१६, एप्रिल २०१६ ते मार्च २०१७ अशा २२ महिन्यांचे वेतन व भत्ते अधिकाऱ्यांनी अडविले आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियावर उपासमारीचे व कर्जाचे डोंगर वाढले आहे. या अन्यायाविरुध्द नंदनवार यांनी गिरोला पहाडी येथील भंडारा सिंचन मंडळ कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले आहे.
वडिलांवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडून न्याय मिळावा यासाठी देवनाथ नंदनवार यांची दहा वर्षीय चिमुकली निहारिका व त्यांची पत्नी अर्चना याही उपोषणाला बसल्या आहेत. दहा वर्षीय चिमुकलीने वडिलांच्या न्यायासाठी उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे. प्रशासनाने चिमुकलीच्या उपोषणाची दखल वेळीच घेवून नंदनवार यांना न्याय मिळावा अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. उपोषणादरम्यान नंदनवार कुटुंबियाच्या जीवीताला धोका निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी प्रशासनाची राहील असा इशारा त्यांनी निवेदनातून दिला आहे.