एक दिवस आधी पण चार महिन्यांनी पोहचले केंद्राचे पथक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:28 AM2020-12-25T04:28:28+5:302020-12-25T04:28:28+5:30
दौरा सुरू करण्यापुर्वी केंद्रीय पथकाने जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीत जावून धान्याची पाहणी केली. सभापती ...
दौरा सुरू करण्यापुर्वी केंद्रीय पथकाने जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीत जावून धान्याची पाहणी केली. सभापती रामलाल चौधरी यांनी धान्य प्रतवारीची माहिती पथकाला दिली. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी धानाचा उतारा ३० टक्क्यापर्यंत असल्याचे सांगितले. त्यानंतर या पथकाने पिंडकेपार गावाला भेट दिली. अतिवृष्टीने नुकसान झालेल्या घराची पाहणी केली. तसेच शेतात, बांधावरही पथक पोहचले. यावेळी राकेश वंजारी, लक्ष्मण निंबार्ते, वसंत सार्वे या शेतकऱ्यांनी कैफियत मांडली. त्यानंतर पवनी तालुक्यातील गावांनाही भेट दिली.
नुकसानग्रस्त भागाची पाहणी करताना अनेक शेतकऱ्यांनी अद्यापही मदत मिळाले नसल्याचे या पथकापुढे सांगितले. वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे बेला, कोरंभी रस्ता वाहून गेला होता. प्रशासनाने हा रस्ता दुरूस्त करून दळणवळण व्यवस्था सुरळीत केली. त्याबद्दल या पथकाने समाधान व्यक्त केले.
बॉक्स
अतिवृष्टीत १४४ गावे प्रभावित
जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी आणि महापूराने भंडारा, मोहाडी, तुमसर, पवनी, लाखांदूर तालुक्यातील १४४ गावे प्रभावित झाली होती. पुरात पाच हजार ३९८ घरांचे नुकसान झाले होते. तसेच चौघांचा मृत्यू झाला होता. १९ हजार ७९३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. यासोबतच पाणीपुरवठा योजना, मत्स्यव्यवसाय, वीज वितरण, रस्ते, आरोग्य सेवा, सिंचन प्रकल्प आदींचेही मोठे नुकसान झाले. ही माहिती केंद्रीय पथकाला देण्यात आली.