तिथे फेकली जातात मृत जनावरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 10:16 PM2018-06-29T22:16:03+5:302018-06-29T22:16:28+5:30
वस्तू महाग आणि जीवन स्वस्त आहे की काय? या अर्विभावात नगरपालिका प्रशासनाचे कार्य सुरू असल्याचे दिसून येत आहे. पालिका प्रशासनाच्या हद्दीत येणाऱ्या शहराच्या सीमावर्ती भागात चक्क मृत जनावरे फेकली जात असून वायु प्रदुषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
इंद्रपाल कटकवार।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : वस्तू महाग आणि जीवन स्वस्त आहे की काय? या अर्विभावात नगरपालिका प्रशासनाचे कार्य सुरू असल्याचे दिसून येत आहे. पालिका प्रशासनाच्या हद्दीत येणाऱ्या शहराच्या सीमावर्ती भागात चक्क मृत जनावरे फेकली जात असून वायु प्रदुषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
स्वच्छतेला अनन्यसाधारण महत्व देऊन केंद्र शासनाने चार वर्षांपूर्वी स्वच्छ भारत अभियानाला प्रारंभ केला. याची सुरूवात घराघरातून करण्यात आली. शाळा, महाविद्यालये, शासकीय, निमशासकीय कार्यालये, खासगी आस्थापना, व्यापरी प्रतिष्ठाने, सर्वजनिक ठिकाणे यासह सर्वच महत्वपूर्ण केंद्रांवर स्वच्छतेचा ध्यास हा मूलमंत्र देऊन अभियानाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. मात्र भंडारा शहर याला अपवाद ठरत आहे. राष्ट्रीय स्वच्छता अभियानात राज्य पातळीवर ५० व्या क्रमांकावर असलेल्या भंडारा शहराला समाधान मानावे लागले.
शहराच्या अंतर्गत भागातही हवी तेवढी स्वच्छतेची काळजी घेतली जात नाही. यासाठी केवळ पालिका प्रशासन जबाबदार नाही. शहरातील नाल्यासह रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे ढिगारे दिसून येत आहे.
भंडारा शहरात पुर्वेकडून एण्ट्री करीत असताना दुर्गंधीमुळे स्वच्छतेबाबत भंडाराकरांची मान आपसुकच खाली जाते. बैल बाजार परिसर ते टी-पार्इंटपर्यतच्या भागात शहरात मृत जनावरे आणून येथे फेकून दिली जातात. यासह सडलेला भाजीपाला व अन्य कचराही राजरोसपणे तिथेच फेकला जात आहे. नगर पालिका प्रशसानाने टी-र्पांटजवळील डाव्या बाजुकडील जागा मारबत दहनासाठी ठरवून दिली असून त्याच ठिकाणी ‘कचरा फेकू नये’ असा फलकही लावण्यात आलेला आहे. जिथे फलक तिथेच सर्वात जास्त कचरा फेकला जात असल्याचे दृष्य भंडाऱ्यात पहावयास मिळत आहे.
परिसरातील नागरिक त्रस्त
जुन्या राष्ट्रीय महामार्र्गाहून येत असताना उजव्या बाजुला ग्रामसेवक कॉलनी आहे. याच कॉलनीसमोर बीटीबी सब्जी मंडी, जलशुद्धीकरण केंद्र आहे. ग्रामसेवक कॉलनीला लागुनच प्रोफेसर कॉलनी, शासकीय धान्य गोदाम व बाजुला जिल्हा सामान्य रूग्णालय आहे. जुन्या महामार्गावरील दुर्गधींचा सर्वात जास्त त्रास येथील कॉलनीवासियांना सहन करावा लागतो. येथुन रहदारी करताना तोंडावर रूमाल घेऊनच जावे लागते. वायुप्रदुषणामुळे विविध आजार बळावण्याची शक्यता नाकारता येत नाही.