स्मशानभूमीत तोडले टाके; पोटातच दाखविले मृत बाळ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2024 12:50 PM2024-09-16T12:50:08+5:302024-09-16T12:50:56+5:30

काही काळ तणावाची स्थिती : उपचारादरम्यान गर्भार मातेचा मृत्यू

Dead baby shown in womb people got angry in Graveyards | स्मशानभूमीत तोडले टाके; पोटातच दाखविले मृत बाळ

Dead baby shown in womb people got angry in Graveyards

लोकमत न्यूज नेटवर्क 
पालांदूर :
प्रसूतीसाठी आलेल्या गरोदर महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यात पोटातील बाळही दगावले. शवविच्छेदन करून पार्थिव कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले. मात्र, अंत्यविधीच्या वेळी बाळ आईच्या सोबत न दिसल्याने जनाक्रोश झाला. ही घटना लाखनी तालुक्याच्या लोहारा येथे रविवारी उघडकीस आली. अस्मिता महेश मेश्राम (२९), रा. लोहारा, असे मृत महिलेचे नाव आहे. जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय चमूने स्मशानभूमीत दाखल होऊन महिलेवर झालेल्या शस्त्रक्रियेचे टाके तोडत बाळ दाखविले. तब्बल सात तासांनंतर अंत्यविधी पार पाडण्यात आला. या घटनेने मात्र काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती.


माहितीनुसार, १४ सप्टेंबर म्हणजेच शनिवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास लोहारा येथील अस्मिता मेश्राम या गरोदर महिलेला प्रसूतीसाठी खराशी येथील आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचारानंतर भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात 'रेफर' करण्यात आले होते. जिल्हा रुग्णालयातील लेबर रूममध्ये दाखल झाल्यानंतर उपचारादरम्यान अस्मिताचा मृत्यू झाला. 


गर्भवती महिलेचे शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले. यावेळी महिलेच्या मृतदेहासोबत उजव्या बाजूला बाळ ठेवल्याचे सांगण्यात आले होते, असे नातेवाइकांचे म्हणणे होते. रविवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास लोहारा स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी पार्थिव नेले असता बाळावर अंत्यसंस्कार करण्याकरिता पाहिले असता बाळ तिथे आढळले नाही. एकच गोंधळ उडाला. यावेळी शंका-कुशंकांचे पेव फुटले. संतप्त झालेल्या कुटुंबीयांनी व ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. यावेळी तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याने पालांदूर पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला.


यावेळी जिल्हा रुग्णालयाच्या प्रशासनाकडून मृत बाळ मातेच्या पोटात असल्याचे सांगण्यात आले; परंतु कुटुंबीय तसेच ग्रामस्थांनी आमच्या समक्ष पोटात बाळ आहे काय? हे दाखवण्यात यावे, अशी मागणी केली. यावेळी जिल्हा रुग्णालयातील चमूने घटनास्थळी येत मृत गरोदर महिलेचे टाके काढत पोटातील बाळ दाखवले. बाळ आढळून आल्यानंतर तणाव निवळला. त्यानंतर मृत महिलेवर बाळासह अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र, तोपर्यंत सात तासांचा कालावधी लोटला होता. मृत महिलेच्या मागे पती, मुलगा असा परिवार आहे. यासंदर्भात जिल्हा शल्य चिकित्सक दीपचंद सोयाम यांच्याशी भ्रमणधणीवर संपर्क साधला असता होऊ शकला नाही.


अन् तणाव निवळला... 
प्रसूती झाल्यानंतर बाळ आईच्या उजव्या बाजूला ठेवले आहे, असे सांगण्यात आले होते. मात्र, अंत्यविधीच्या वेळी बाळ न आढळून आले नाही. परिणामी बाळ आम्हाला दाखविण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. यात जिल्हा सामान्य रुग्णालयाची चमू दाखल होत महिलेचे टाके तोडत पोटातील मृत बाळ दाखविण्यात आले. यानंतर तणाव मावळला.


"वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार स्मशानभूमीत दाखल झालो. सायंकाळी ४ वाजता जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी तिथेच टाके तोडीत पोटातील मृत बाळ नातेवाइकांना दाखविले. बाळ दिसताच वातावरण शांत झाले." 
-डॉ. प्रशांत फुलझले, ग्रामीण रुग्णालय, पालांदूर


"लोहारा येथील स्मशानभूमीत तणावपूर्ण स्थिती असल्याची माहिती मिळाली. लगेच कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त लावला. वरिष्ठांना घटनेची माहिती दिली. पालांदूर पोलिस ठाण्यात याप्रकरणी मर्ग दाखल करण्यात आला आहे." 
- विवेक सोनवणे, पोलिस निरीक्षक, पालांदूर
 

Web Title: Dead baby shown in womb people got angry in Graveyards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.