मृत योगेशची दुचाकी १५ दिवसांनंतर मैदानावर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2023 03:50 PM2023-04-27T15:50:24+5:302023-04-27T15:51:02+5:30
बेवारस उभ्या असलेल्या दुचाकीची कुणीच घेतली नाही दखल
गोपालकृष्ण मांडवकर
भंडारा : १५ दिवसांपूर्वी इटगाव (ता. पवनी) शेतशिवारात योगेश लोखंडे याचे प्रेत आढळून आले होते. कुजलेल्या अवस्थेत असलेल्या या प्रेताची अवस्था पाहून आत्महत्या असल्याचा अंदाज पोलिसांनी लावला होता. मात्र तो ज्या दुचाकीने घरून गेला होता, ती गायब असल्याने या घटनेतील गुढ वाढले होते. तीन दिवसांपूर्वी ही दुचाकी सिंदपुरी गावातील बौैद्धविहाराच्या मोकळ्या मैदानावर पूर्वेस बेवारस असल्याचे पोलिसांना कळल्यावर त्यांनी ताब्यात घेतली असता, ती योगेशची असल्याचे स्पष्ट झाले. यामुळे या प्रकरणातील गुंता पुन्हा वाढला आहे.
योगेश लोखंडे याचे प्रेत इटगाव शेतशिवारात ७ एप्रिलला आढळले होते. या घटनास्थळापासून अवघ्या ३०० मिटर अंतरावरील शिंदपुरी गावालगतच्या मैदानात ही दुचाकी आढळून आली. योगेश पवनी येथील पद्मा वॉर्डातील असून ठेकेदारीचा व्यवसाय करायचा. मृतदेह सापडल्याच्या ३९ दिवसांपूर्वी तो आपल्या दुचाकीने घरून गेल्यापासून परतलाच नव्हता. नंतर त्याचे प्रेतच शेतशिवारात आढळले. त्याच्या दुचाकीचा शोध पोलिसांकडून सुरू असला तरी त्याबद्दल माहितीच मिळत नव्हती. अखेर तीन दिवसांपूर्वी दुचाकीचा पत्ता लागला. ही दुचाकी नक्की तिथे कोणी ठेवली, किती दिवसांपासून होती, गावकऱ्यांनी माहिती का दडविली याचा शोध घेण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर आहे.