घातक इकाॅर्निया हाेऊ शकते जैविक पध्दतीने नष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:42 AM2021-08-18T04:42:04+5:302021-08-18T04:42:04+5:30

भंडारा : विशालपात्र असलेल्या वैनगंगा नदीला घातक इकाॅर्नियाचा विळखा सुटता सुटत नाही. दरवर्षी इकाॅर्नियाने वैनगंगेचे पात्र झाकले जात आहे. ...

Deadly Icarnia can be biologically destroyed | घातक इकाॅर्निया हाेऊ शकते जैविक पध्दतीने नष्ट

घातक इकाॅर्निया हाेऊ शकते जैविक पध्दतीने नष्ट

googlenewsNext

भंडारा : विशालपात्र असलेल्या वैनगंगा नदीला घातक इकाॅर्नियाचा विळखा सुटता सुटत नाही. दरवर्षी इकाॅर्नियाने वैनगंगेचे पात्र झाकले जात आहे. विविध उपाय केल्यानंतरही इकाॅर्नियाचे नियंत्रण शक्य झाले नाही. मात्र आता जैविक पध्दतीने इकाॅर्नियाचे निर्मूलन शक्य आहे. पाने कुरतडणारे विविल कीटक या इकाॅर्नियावर साेडल्यास काही दिवसात इकाॅर्नियाचे निर्मूलन शक्य आहे.

जलकुंभी अर्थात इकाॅर्निया ही एक पाण्यात तरंगणारी वनस्पती आहे. तिला बेंगाल टेरर म्हणूनही ओळखले जाते. मुख्यत: ही वनस्पती ब्राझीलची असून ती भारतासह जगभरात पसरली आहे. एका राेपाला आठ ते दहा जांभळ्या रंगाची आकर्षक फुले लागतात आणि त्यापासून प्रत्येक वर्षी एक हजार बीज तयार हाेतात. त्यामुळे ही वनस्पती अत्यंत वेगाने वाढते. भंडारा शहराजवळून वाहणाऱ्या वैनगंगेला इकाॅर्नियाने गिळंकृत केले आहे. ही वनस्पती पाण्यावर एखाद्या लाॅनसारखी पसरली आहे. पाण्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण करण्यासाेबतच सूर्यकिरणेही पाण्यापर्यंत पाेहाेचत नाहीत. पाण्यातील ऑक्सिजनच्या मात्रेत अडथळा निर्माण करते. त्यामुळे जल वनस्पती, मासे व इतर प्राणी मृत्युमुखी पडतात. मासेमारीवर त्याचा परिणाम हाेताे. ही एक माेठी गंभीर समस्या झाली आहे.

जलकुंभीच्या नियंत्रणात जैविक नियंत्रण अत्यंत प्रभावी ठरू शकते. पाने खाणारे कीटक या परिसरात साेडल्यास त्यातून ही वनस्पती नष्ट करता येऊ शकते. एकरी एक हजार कीटक साेडल्यास हे कीटक वनस्पतीला खाऊन नष्ट करू शकतात. यासाेबत एकात्मिक व्यवस्थापन आणि रासायनिक नियंत्रण पध्दतही आहे. परंतु यासाठी प्रशासनाच्या पुढाकाराची गरज आहे.

बाॅक्स

जबलपूरच्या संशाेधन संस्थेत मिळतात कीटक

इकाॅर्निया नियंत्रणात महत्त्वाची भूमिका विविल कीटक बजावू शकतात. या कीटकाला शास्त्रीय भाषेत नाेओकेटीनस इकाॅर्नी असे म्हणतात. भारतीय कृषी संशाेधन परिषदेअंतर्गत येणाऱ्या जबलपूर येथील डायरेक्टर ऑफ विड रिसर्च येथे हे कीटक उपलब्ध आहेत. एका कीटकाची किंमत साधारणत: ५० रुपये असून एकराला एक हजार ते दीड हजार कीटक लागतात. एकदा कीटक इकाॅर्नियावर साेडल्यानंतर त्यांची संख्या वाढत जाते. त्यामुळे पुन्हा कीटक विकत घेण्याची गरज राहत नाही. यातून इकाॅर्नियाचे नियंत्रण हाेऊ शकते.

काेट

वैनगंगा नदीच्या प्रदूषणात इकाॅर्नियाने माेठी भर घातली आहे. या वनस्पतीला समूळ नष्ट करण्यासाठी जैविक किंवा एकात्मिक व्यवस्थापन आवश्यक आहे. विविल नामक कीटक हा प्रभावी ठरू शकताे. पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्यासाठी इकाॅर्नियाचे नियंत्रण आवश्यक आहे.

- डाॅ. पी. बी. मेश्राम, वनसंशाेधन संस्थेचे सेवानिवृत्त शास्त्रज्ञ, साकाेली

Web Title: Deadly Icarnia can be biologically destroyed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.