लाडक्या चंद्रशेखरला साश्रूनयनांनी अखेरचा निराेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2022 05:00 AM2022-03-14T05:00:00+5:302022-03-14T05:00:49+5:30
साेपस्कार पूर्ण करून १०.२७ वाजता आर्मीच्या सजविलेल्या वाहनातून शहीद संदीप भाेंडे यांचा शेवटचा प्रवास सुरू झाला. यावेळी वाहनात वीर माता, वडील, वीर पत्नी, पाच वर्षीय पारस, भाऊ, बहीण व नातेवाईक उपस्थित हाेते. ही अंत्ययात्रा खात राेड ते शास्त्री चाैक येथील मार्गस्थ हाेऊन महात्मा गांधी चाैकात पाेहाेचली. यावेळी काही संघटनांच्या वतीने शहीद भाेंडे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. घाेषणांनी आसमंत दणाणून साेडला.
इंद्रपाल कटकवार
लाेकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : सैन्यदलात जम्मू-काश्मीर येथे कर्तव्यावर असलेल्या लान्स हवालदार चंद्रशेखर भाेंडे (३४) यांच्या पार्थिवावर वैनगंगा नदीघाटावर रविवारी दुपारी २.३० वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. जिल्ह्याच्या लाडक्या सुपुत्राला उपस्थित हजारो नागरिकांनी साश्रूनयनांनी अखेरचा निराेप दिला. जिल्हा पाेलीस दलातर्फे बंदुकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना देण्यात आली.
रविवारी सकाळी ९.०९ वाजता शहीद भाेंडे यांचे पार्थिव तकिया वाॅर्ड स्थित न्यू ऑफिसर काॅलनी येथे आणण्यात आले. पार्थिव येताच कुटुंबीयांनी एकच हंबरडा फाेडला. लाडक्या सुपुत्राचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी जिल्हाभरातून हजाराेच्या संख्येने नागरिक आले हाेते. त्यांच्या पार्थिवाचे खासदार सुनील मेंढे, आमदार राजू कारेमोरे, माजी आमदार चरण वाघमारे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी महेश पाटील यांनी दर्शन घेतले.
साेपस्कार पूर्ण करून १०.२७ वाजता आर्मीच्या सजविलेल्या वाहनातून शहीद संदीप भाेंडे यांचा शेवटचा प्रवास सुरू झाला. यावेळी वाहनात वीर माता, वडील, वीर पत्नी, पाच वर्षीय पारस, भाऊ, बहीण व नातेवाईक उपस्थित हाेते.
ही अंत्ययात्रा खात राेड ते शास्त्री चाैक येथील मार्गस्थ हाेऊन महात्मा गांधी चाैकात पाेहाेचली. यावेळी काही संघटनांच्या वतीने शहीद भाेंडे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. घाेषणांनी आसमंत दणाणून साेडला.
शहराच्या मुख्य रस्त्याने मार्गक्रमण करीत अंतयात्रा वैनगंगा नदीघाटावर पाेहाेचली. याप्रसंगी आमदार राजू कारेमोरे, जिल्हाधिकारी संदीप कदम, पोलीस अधीक्षक वसंत जाधव, कर्नल मनकोटिया, मेजर त्रिपाठी, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी महेश पाटील, यांच्यासह स्वातंत्र्य संग्राम सैनिक संघटनांच्या वतीने पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. जिल्हा पोलीस दलाने बंदुकीच्या तीन फैऱ्या झाडून मानवंदना दिली.
सैन्यदलातर्फेही मानवंदना वाहण्यात आली. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे सुधीर लुटे, घनमारे यांच्यासह उपस्थित जनसमुदायाने सामूहिक श्रद्धांजली अर्पण केली. शहीद भोंडे यांचे लहान बंधू सचिन भोंडे यांनी पार्थिवाला भडाग्नी दिला.
घोषणांनी दणाणला आसमंत
- जम्मू-काश्मीर येथे भारतीय सैन्यातील २१ महार बटालियनमध्ये हवालदार पदावर कार्यरत संदीप उर्फ चंद्रशेखर रूपचंद भोंडे यांचा यांना अपघातात वीरमरण आले. त्यांच्या पार्थिवावर रविवारी २ वाजताच्या सुमारास वैनगंगा नदीघाटावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. भाऊ सचिन भोंडे यांनी पार्थिवाला भडाग्नी दिला. जिल्ह्याच्या या लाडक्या सुपुत्राला अखेरचा निरोप देण्यासाठी आलेल्या मित्र परिवारासह हजारो नागरिकांनी ‘‘भारत माता की जय, जब तक सुरज चांद रहेगा संदीप तेरा नाम रहेंगा, वंदे मातर्म,’’ अशा घोषणा देत आसमंत दणाणून सोडला. बंदुकीच्या तीन फैरी झाडून जिल्हा पोलीस दलातर्फे मानवंदना वाहण्यात आली. यावेळी आर्मी स्टाफसह, उपस्थित विविध संघटनांनी शहीद भोंडे यांना आदरांजली वाहिली.
पारस म्हणाला, ‘पप्पा कधी येणार?’
- शहीद चंद्रशेखर भोंडे यांना पाच वर्षाचा ‘पारस’ हा एकुलता मुलगा. रविवारी सकाळी चंद्रशेखर यांचे पार्थिव आर्मीच्या वाहनाने घरी आणण्यात येत होते. यावेळी आजोबांच्या कुशीत बसून पारस बाबांची प्रतीक्षा करत होता. आज घरी काहीतरी कार्यक्रम आहे, असेच कदाचित त्याला वाटत असावे. पप्पांच्या फोटोला पाहत असताना निरागस पारसने आजोबाला प्रश्न विचारला, ‘‘पप्पा कधी येणार? क्षणभरसाठी आजोबाही नि:शब्द झाले. त्यांच्या डोळ्यातून फक्त अश्रुधारा वाहत असतानाच त्यांनी पारसला घट्ट कवटाळून घेतले.
आई, पत्नीच्या डोळ्यातील अश्रू थांबेना
- नऊ महिने गर्भात ठेवून जन्म दिला, अशा लाडक्या लेकराचे पार्थिव बघून आईने हंबरडा फोडला. वीर पत्नी किरण, बहीण ज्योती, भाऊ सचिन यांचे अश्रू थांबायचं नाव घेत नव्हते. पाच वर्षाचा पारस आई, आजी, आजोबा, काका, आत्या सारख्या का रडताहेत, हे त्याला कळेनासे झाले असेल. दगडालाही पाझर फुटावा हाच अनुभव घेत येणारा प्रत्येकजण पाणावलेल्या डोळ्यांनी परतत होता. तीन महिन्यांची सुटी कुटुंबियांसाेबत घालवून ५ मार्च राेजी संदीप कर्तव्यावर रुजू झाला हाेता. मात्र तीन दिवसानंतरच त्याच्या मृत्यूची वार्ता आली. नियतीसमोर कुणाचेही काहीही चालत नाही, हेच निर्विवाद सत्य यावेळी जाणवत होते.