टिप्परच्या धडकेत तरूणाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 01:07 AM2018-03-30T01:07:37+5:302018-03-30T01:07:37+5:30
रेती वाहून नेणाऱ्या टिप्परने एका दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरूवारला दुपारी १.३० वाजता तुमसरजवळील खापा चौकात घडली.
ऑनलाईन लोकमत
तुमसर : रेती वाहून नेणाऱ्या टिप्परने एका दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरूवारला दुपारी १.३० वाजता तुमसरजवळील खापा चौकात घडली.
अफरोज इजराईल शेख (२६) रा.मोहाडी असे मृतकाचे नाव आहे. या अपघातात अन्य दोघे गंभीर जखमी असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे. अफरोज शेख हा वडील इजराईल शेख (५६) व मावशी खैदून शेख (६५) रा.पारशिवनी यांना घेऊन दुचाकी (क्र. एमएच ३६/एन २९७९) ने तुमसरहून मोहाडीला परत जात होते. दरम्यान विरूद्ध दिशेने येणाºया टिप्पर क्र. (एमएच ४० एन ६९४८) ने तिरोडाकडे जाताना वळणावर टिप्परने जोरदार धडक दिली. दुचाकी टिप्परखाली येऊन टिप्परचे चाक अफरोजच्या डोक्यावरून गेल्यामुळे अफरोजचा जागीच मृत्यू झाला.
या अपघातात ईजराईल शेख यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर तुमसर येथे उपचार सुरू आहेत.
खैरुन शेख यांना किरकोळ दुखापत झाली असून नशिब बलवत्तर म्हणून त्या बचावल्या. या अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला असून पोलीस त्याच्या मागावर आहेत. घटनेची माहिती होताच पोलीस उपनिरीक्षक म्हैसकर, पोलीस शिपाई धावडे, बडोले, बुराडे यांनी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. नायब तहसीलदार पाटील यांनी घटनास्थळाला भेट दिली. अपघातस्थळी रूग्णवाहिका उशिराने आल्यामुळे जखमींना पोलीस वाहनातून रूग्णालयात नेण्यात आले.
गतिरोधकाची गरज
खापा चौकातूनच तुमसर शहरात जावे लागते. या चौकात गतिरोधक नाही. रामटेक, भंडारा, तुमसर, तिरोडा या चारही दिशेने येथूनच वाहने जातात. गतिरोधक नसल्यामुळे वाहने भरधाव जातात. अफरोजचा मृत्यू टिप्पर चालकाच्या निष्काळजीमुळे झाला. खापा चौकात कायमस्वरूपी पोलीस चौकीची गरज आहे. या चौकातून दिवसभरात सुमारे दोन ते अडीच हजार ट्रक धावतात. एवढी रहदारी असताना पोलीस चौकीची गरज आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याचे तालुका मुख्यालय येथून हाकेच्या अंतरावर आहे. या विभागाने पुढाकार घेऊन गतिरोधक तयार करण्याची गरज आहे.
खापा चौकात गतिरोधकाची गरज आहे. परंतु प्रशासनाचे याकडे लक्ष गेले नाही. याशिवाय याठिकाणी कायमस्वरूपी पोलीस चौकी देण्यात यावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल.
-बालकदास ठवकर, संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती तुमसर.