भंडारा अग्निकांडातील ‘त्या’ बालकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:31 AM2021-02-08T04:31:20+5:302021-02-08T04:31:20+5:30
भंडारा : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात घडलेल्या अग्निकांडात दहा बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता, तर सात जणांना वाचविण्यात ...
भंडारा : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात घडलेल्या अग्निकांडात दहा बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता, तर सात जणांना वाचविण्यात यश आले होते. मात्र, त्यापैकी उपचारार्थ नागपूर येथे दाखल असलेल्या एका बालकाचा शुक्रवारी मृत्यू झाला. भंडारा तालुक्यातील कोका येथील सोनू मनोज मारबते यांचा तो बालक होता. या बालकाच्या मृत्यूने जिल्हा रुग्णालयातील घटना पुन्हा झोतात आली आहे.
माहितीनुसार, ९ जानेवारीला पहाटे घडलेल्या अग्निकांडात वाचविण्यात आलेल्या सात बालकांवर उपचार सुरू होते. त्यापैकी भंडारा तालुक्यातील कोका येथील सोनू मनोज मारबते यांच्या बालकाची तब्बेत अस्वस्थ असल्याने त्याला १६ जानेवारी रोजी नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ हलवण्यात आले होते. प्रकृतीत सुधारणा झाल्याने १ फेब्रुवारीला घरी रवानगी करण्यात आली होती. सुटी झाल्याच्या चार दिवसात त्याची प्रकृती खालावली. बालक सतत रडत असल्याने तसेच त्याची झोप होत नसल्याने त्याला पुन्हा भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले. डॉक्टरांनी त्याला तपासाअंती मृत घोषित केले. परिणामी भंडारा येथील अग्निकांडात मृत पावलेल्या बालकांची संख्या आता ११ झाली आहे.
बॉक्स
बालकाला ‘मिल्क ॲसपिरेशन सिंड्रोम’चा आजार
अग्निकांडातून वाचलेल्या बाळांवर उपचार सुरू होते. त्यापैकीच मारबते या दाम्पत्याचा बालकही यात सहभागी होता. बालकाला श्वास घ्यायला त्रास होता, तर त्याच्या डोळ्यातून सतत पाणी यायचे. शरीरात कार्बनची मात्रा असल्यामुळे श्वसन संस्थेत त्रास होता. त्याला ‘मिल्क ॲसपिरेशन सिंड्रोम’चा आजार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, खरे कारण उत्तरीय तपासणीच्या अहवालावरून स्पष्ट होणार आहे.
कोट बॉक्स
१६ जानेवारी रोजी या बालकाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ हलविण्यात आले होते. त्याच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान, शुक्रवारी ५ फेब्रुवारीला त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले होते. तपासणीनंतर बालकाला मृत घोषित करण्यात आले.
डॉ. पियुष जक्कल, जिल्हा शल्य चिकित्सक, भंडारा