कुत्र्यांच्या हल्ल्यात चितळाचा मृत्यू
By admin | Published: March 31, 2017 12:26 AM2017-03-31T00:26:38+5:302017-03-31T00:26:38+5:30
तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रातील कारली जंगलात बिबट्याने एका चितळाचा पाठलाग केला.
कारली येथील घटना : बिबट्याचा हल्ल्यातून बचावला पण
भंडारा : तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रातील कारली जंगलात बिबट्याने एका चितळाचा पाठलाग केला. यात जीवाच्या आकांताने सैरावैरा पळणारा हा चितळ कारली गावात शिरला. मध्यरात्रीच्या सुमारास घडलेला हा प्रकार गावातील मोकाट कुत्र्यांना दिसताच त्यांनी पाठलाग केला. दमलेल्या चितळाला कुत्र्यांनी पकडले. कुत्र्यांच्या गोंगाटाने गावकरी जागे झाल्याने त्यांनी कुत्र्यांच्या तावडीतून सुटका केली. गावकरी व वनविभागाचे मदतीने तुमसर येथे उपचारासाठी नेत असताना वाटेतच चितळाचा मृत्यू झाला.
नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रातील कारली गावच्या जंगलात बुधवारच्या मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने चितळाची शिकार करण्याचा प्रयत्न झाला. मात्र बिबट्याची चाहुल लागताच चितळाने जंगलात धूम ठोकली. जंगलात अनेक ठिकाणी लपण्याचा प्रयत्न करणाऱ्या चितळाचा कुठेही थारा लागला नाही. शेवटच्या पर्याय म्हणून चितळाने जीव वाचविण्यासाठी कारली गावाच्या दिशेने धाव घेतली. बिबट मागे चितळ पुढे, असा पाठलाग सुरू असताना चितळाने गावातील एकाच्या घरी आश्रय घेतला. दोनदा झालेल्या हल्ल्यांनी त्याच्या काळजाचे ठोके वाढलेले होते. गावकऱ्यांनी नाकाडोंगरी वनविभागाचे वनपाल धुर्वे यांनी माहिती दिली. धुर्वे यांच्या नेतृत्वात वनविभागाची चमू गावात पोहचली. तोपर्यंत पहाट होण्यास आली होती. चितळाला उपचारासाठी तुमसर येथे हलविण्याचा बंदोबस्त लावण्यात आला. वाहन रस्त्यात असतानाच चितळाचा मृत्यू झाला. चितळाला चिचोली येथील शासकीय वनडेपोत आणण्यात आले. पशुवैद्यकीय अधिकारी व वन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पुरण्यात आले. (स्थानिक प्रतिनिधी)