मृत्यूनंतरही भय ईथे संपत नाही...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 11:37 PM2018-03-06T23:37:22+5:302018-03-06T23:37:22+5:30
माणुस जन्माला आल्यानंतर एक दिवस मृत्यू अटळ आहे. जगताना कितीतरी हालअपेष्ठा सहन करीत असतो. मानसन्मान, माझा-तुझा करीत जगत असतो.
आॅनलाईन लोकमत
भंडारा : माणुस जन्माला आल्यानंतर एक दिवस मृत्यू अटळ आहे. जगताना कितीतरी हालअपेष्ठा सहन करीत असतो. मानसन्मान, माझा-तुझा करीत जगत असतो. परंतु मरणानंतर सरणावर जाताना या समस्या कायम असल्याची प्रचिती भंडारा जिल्ह्यात येत आहे. चार दिवसांपूर्वी जवाहरनगर येथे कब्रस्थान नसल्यामुळे पार्थिवच ग्रामपंचायत कार्यालयात नेण्याची वेळ तेथील मुस्लिम बांधवावर आली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील स्मशानभूमीची दुरावस्था, जागेचा अभाव आणि सुविधांबाबत मागोवा घेतला असता हे दाहक वास्तव उघडकीस आले.
भंडारा जिल्ह्यातील ७७७ गावांचा कारभार ५४१ ग्रामपंचायतीमधून केला जातो. या ग्रामपंचायतींच्या अखत्यारितील स्मशानभूमीत सोयीसुविधा निर्माण व्हाव्यात यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला. मात्र अनेक गावांमध्ये स्मशानभूमीपर्यंत जनसुविधा योजना पोहचलेल्या नाहीत. त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी जाणाºया नातेवाईकांना आजही अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
भंडारा जिल्ह्यातील ७७७ गावांपैकी केवळ ४८३ गावांमध्येच स्मशानशेडची निर्मिती करण्यात आली. त्यामुळे २९४ गावांतील नागरिकांना पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याकरिता शेतशिवारात किंवा नदी-नाल्याच्या काठावर सोपस्कार आटोपावे लागत आहे. २०८ स्मशानभूमीत शेडसह पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेसाठी हातपंपाची व्यवस्था करण्यात आली. तर ५६९ स्मशानभूमी हातपंपापासून वंचित आहे. त्यामुळे या गावातील नागरिकांना एक तर घरुनच पाण्याची व्यवस्था करुन न्यावे लागते अन्यथा नदी-नाल्यांमध्ये असलेल्या पाण्यांवर अंत्यसंस्कारानंतरची प्रक्रिया आटोपावी लागते. उन्हाळ्याच्या दिवसात नदी-नाल्यांसह ओढयातील जलस्त्रोत आटल्याने आधीच शोकाकूल नातेवाईकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याची प्रचिती जिल्हावासियांना येत आहे.
या सुविधांचा अभाव
अनेक गावात स्मशानभूमी असली तरी नागरिकांनी मागणी करुनही त्यांना जनसुविधा योजनेच्या निधीतून स्मशानभूमी किंवा तेथील सुविधा उपलब्ध करुन देण्यात प्रशासनाला यश आले नाही. अनेक स्मशानभूमीकडे जाणाºया रस्त्यांची समस्या आजही कायम आहे. पावसाळ्यात अंत्यसंस्कारासाठी जाताना अनेकांना चिखलमाती तुडवित जावे लागते. यात अनेकदा मृतदेहाची विटंबनाही होते. स्मशानभूमीत शेड, पाण्याची सुविधा, सभागृह, विद्युत पुरवठा नसल्याने ग्रामस्थांना समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
स्मशानभूमीला अतिक्रमणाने घेरले
गाव तिथे स्मशानभूमी ही कागदोपत्री अस्तित्वात आहे. मात्र अनेक गावातील स्मशानभूमीवर दुर्लक्षितपणामुळे लगतच्या शेतकरी किंवा प्लॉट विक्रेत्यांनी अतिक्रमण केल्याचेही प्रकरण उघडकीस आले आहे. अनेक प्लॉट धारकांनी काही ठिकाणच्या स्मशानभूमीत तर चक्क प्लॉट पाडून त्याची नियमबाह्यरित्या विक्री केल्याचेही स्पष्ट झाले आहे. या प्रक्रियेत महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे आता स्मशानभूमीही सुरक्षीत नसल्याचे दिसून येते.
कब्रस्थानाचाही प्रश्न ऐरणीवर
जवाहरनगर : हिंदूंच्या अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीची जागा जशी राखीव ठेवण्यात येते, तशीच मुस्लिम बांधवांसाठी कब्रस्थानची गरज असते. असे असले तरी अनेक गावांमध्ये तिथे स्मशानभूमी आणि कब्रस्थानसाठी जागाच उपलब्ध नसल्यामुळे वाद निर्माण होतात. काही ठिकाणी कब्रस्थान असले तरी तिथे कुठलिही सुविधा निर्माण करुन देण्यात आली नाही. त्यामुळे समस्या कायम राहत आहेत. ठाणा पेट्रोलपंप येथे कब्रस्थानची मागणी दुर्लक्षित असल्याने जवाहरनगर येथील अब्दुल मजीत शेख यांचे २ मार्चला निधन झाले. कब्रस्थान नसल्यामुळे संतप्त मुस्लिम बांधवांनी पार्थिवच ग्रामपंचायत कार्यालयात आणले होते.