विजेच्या धक्क्यानेच बिबट्याचा मृत्यू ?
By admin | Published: February 1, 2015 10:49 PM2015-02-01T22:49:48+5:302015-02-01T22:49:48+5:30
खंदाड राखीव जंगलातील कक्ष क्रमांक ७० मध्ये बिबट मृतावस्थेत असल्याचे लोकमतने रविवारी वृत्त प्रकाशित करताच वनविभागात खळबळ उडाली. बिबट्याचा मृत्यू कशामुळे झाला
मोहन भोयर - तुमसर
खंदाड राखीव जंगलातील कक्ष क्रमांक ७० मध्ये बिबट मृतावस्थेत असल्याचे लोकमतने रविवारी वृत्त प्रकाशित करताच वनविभागात खळबळ उडाली. बिबट्याचा मृत्यू कशामुळे झाला हे सांगण्यास वनविभाग असमर्थ ठरला आहे. वनअधिकाऱ्यांनी रविवारी दुपारी पंचनामा केला. जास्त दिवस लोटल्याने व्हीसेरा मिळू शकत नाही. त्यामुळे पशूवैद्यकिय अधिकाऱ्याने बिबट्याच्या मागील पायाचा पंजा व मिशीचे केस फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आले. मृत बिबट्याला घटनास्थळाशेजारी अग्नी देण्यात आला. वनविभाग येथे सारवासारव करीत असला तरी बिबट्याच्या मृत्यू अवैध वीज प्रवाहाच्या धक्क्यानेच झाल्याची शक्यता आहे.
तुमसर वनपरिक्षेत्रातील खंदाड ते धनेगाव पर्यंत दोन कक्ष आहेत. कक्ष क्रमांक ७० मध्ये खंदाड गावापासून अवघ्या १०० मीटर अंतरावर सुमारे दीड ते दोन वर्षाचा बिबट खंदाड-सिहोरा मार्गाजवळ मृतावस्थेत पडून होता. दहा दिवसापेक्षा जास्त दिवस झाल्याने तो कुंजलेल्या स्थितीत आला होता. खंदाड येथील एका लहान मुलाला बकरी चारताना तो झुडूपाशेजारी प्रथम दिसला. गावात नंतर ती वार्ता पसरली, पंरतु बिबट्याच्या मृत्यूची बातमी सांगितल्यास त्याचा ससेमिरा लागेल म्हणून तो गप्प राहिला. याबाबत लोकमतने वनक्षेत्राधिकारी एस. यु. मडावी यांना संपर्क साधून माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी याला दुजोरा दिला नाही.
बिबट मृत्यू प्रकरणी प्रतिनिधीने रविवारी खंदाड जंगलात भेट दिली असता हरदोली राऊंडमधील वनरक्षक, सोदेपूरचे वनरक्षक घटनास्थळी उपस्थित होते. खंदाडपासून चुलूरडोह पर्यंत ८०० हेक्टरचे राखीव वन आहे. दोन कक्ष जवळ असून दुसऱ्या कक्षाचे वनक्षेत्रफळ ७८७ हेक्टर आहे. सकाळी ११ वाजता नाकाडोंगरीचे पशूवैद्यकिय अधिकारी बनगिरे, वनपरिक्षेत्राधिकारी एस. यु. मडावी यांनी भेट देऊन पंचनामा करण्यात आला. बिबट्याचे शरीर कुजलेले होते. त्यामुळे व्हीसेरा प्राप्त झाला नाही. वन अधिकाऱ्यांनी बिबट्याला घटनास्थळीच जंगलात अग्नी दिली. बिबट्याच्या मागील पंजा व मिशीचे केस फॉरेन्सीक लॅब नागपुर येथे पाठविण्यात आले. बिबट मृत्यूमुळे वनविभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. (तालुका प्रतिनिधी)
विजेच्या धक्क्याने मृत्यू
चिचोली-सिहोरा जंगलमार्गावर खंदाड गाव असून घनदाट जंगल आहे. राखीव वनातूनच रस्ता पुढे जातो. येथून उच्च दाबाची वीज वाहिनी जाते. शिकारी टोली चितळाच्या शिकारीकरीता खाली लोंबकळत वीज तारा सोडतात. खाली जमिनीवर लाकडाच्या खुट्या गाडून ठेवतात रात्री जंगली प्राणी इकडून तिकडे जातात. वीज प्रवाहामुळै त्यांना धक्का लागतो. यात ते गंभीर जखमी होऊन मृत्यूमुखी पडतात. बिबट्याचा मृत्यू वीज धक्क्यानेच झाल्याची शक्यता आहे. वीज तारांच्या खालीच दोन खुट्या आढळल्या नंतर ४० ते ५० मीटर अंतरावर बिबट्या पडून असलेले स्थळ आहे. वनरक्षक एन. आर. साखरवाडे, एस. डब्ल्यू. देव्हाडे यांना बिबट्याच्या मृत्यूबद्दल घटनास्थळी विचारले असता. रानकुत्र्यांच्या हल्ल्यात तो गंभीर जखमी होउन मृत्यू झाला असावा अशी माहिती दिली. पंरतु बिबट्याच्या शरीरावर कोणत्याच जखमा आढळल्या नाहीत. या राखीव वनात आठ वर्षापूर्वी कॅमेरा ट्रॅपमध्ये सोदेपूर येथे वाघीन दिसली होती तेव्हापासून दर्शन झाले नव्हते अशी माहिती या वनरक्षकांनी दिली. धनेगाव येथे झाडांची मोजणी सुरु असल्याने चार दिवसापासून मी आलो नाही अशी कबुली वनरक्षक एन. आर. साखरवाडे यांनी दिली. या कक्षात दोन वनमजूरांची गरज आहे. परंतु मी एकटाच सुमारे ८०० हेक्टर जंगलाची जबाबदारी पार पाडीत असल्याची माहिती दिली. खंदाड येथे शनिवारी लांडग्योन दोन शेळया गोठ्यातून उचलून नेल्याची माहिती ग्रामस्थानीदिली.