वाघिणीच्या हल्ल्यात बिबट्याचा मृत्यू !
By admin | Published: February 2, 2015 10:59 PM2015-02-02T22:59:36+5:302015-02-02T22:59:36+5:30
खंदाड राखीव जंगलातील बिबट मृत्यूप्रकरणी वनविभागाचे अधिकारी अशासकीय संस्था सदस्यांचा निर्वाळा देवून बिबट्याच्या मृत्यूवर पडदा टाकण्याचा प्रयत्न करीत आहे. १० दिवस
तुमसर : खंदाड राखीव जंगलातील बिबट मृत्यूप्रकरणी वनविभागाचे अधिकारी अशासकीय संस्था सदस्यांचा निर्वाळा देवून बिबट्याच्या मृत्यूवर पडदा टाकण्याचा प्रयत्न करीत आहे. १० दिवस बिबट्या मृतावस्थेत पडून होता. शेवटी तो कुजलेल्या स्थितीत आल्यावरही त्याची माहिती वनविभागाला नव्हती. वाघीण व बिबट्यची झुंज झाली व त्यात बिबट्याचा मृत्यू झाल्याचा जावई शोध वनविभागाने लावला आहे. मात्र झुंजीच्या खुणा घटनास्थळावर दिसून आल्या नाहीत.
तुमसर वनपरिक्षेत्रांतर्गत खंदाड ते धनेगावपर्यंत राखीव जंगल आहे. खंदाड गावाजवळ कक्ष क्रमांक ७० मध्ये शनिवारी बिबट मृतावस्थेत पडून असल्याची माहिती मिळाली होती. १० दिवसापेक्षा जास्त दिवस झाल्याने तो कुजलेल्या स्थितीत आला होता. बिबट मृत्यू झालेल्या स्थळापासून ११ केव्हीची उच्च दाबाची वीज वाहिणी गोबरवाही ते सोदेपुरपर्यंत गेली आहे. घटनास्थळाजवळ लाकडी खुंट्या आढळल्या. जंगलात त्या खुंट्या कुठून आल्या असा प्रश्न उपस्थित होतो. गोबरवाही-सितासावंगी रस्त्यावरील हेटी या गावाजवळ रविवारी सकाळी एका महिलेला व तीन युवकांना वाघिण व त्याचे दोन पिल्ले दिसले. खंदाड व सितासावंगीचे अंतर १० ते १२ कि़मी. आहे. वाघीण व बिबट्याच्या झुंजीत बिबट्याचा मृत्यू झाल्याची माहिती उपवनसंरक्षक विनय ठाकरे यांनी दिली. तसा अहवाल तयार करण्यात आल्याचे त्यांनी लोकमतला सांगितले.
वाघीण व तिचे पिल्ले फिरताना बिबट आपल्या पिल्ल्यांना ईजा पोहचवेल म्हणून त्यांच्यात झुंज झाली व यात बिबट्याच्या मानेचे हाड मोडले, असा कयास वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी लावला आहे. एक महिन्यानंतर फॉरेन्सीक लॅबचा अहवाल प्राप्त झाल्यावर बिबट मृत्यू प्रकरणातील तथ्य समोर येणार आहे. बिबट्याचा व्हीसेरा वाळल्याने पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याचा पायाचा पंजा व मिशीचे केस फॉरेन्सीक लॅबला पाठविले.
नाकाडोंगरी व तुमसर वनपरिक्षेत्राच्या सीमा फिडल्या आहेत. या जंगलात दोन नर व दोन माद्या व त्यांचे पिल्ले असल्याची माहिती उपवनसंरक्षक ठाकरे यांनी दिली. वाघीण व बिबट यांच्यात झुंज झाली, असे वनविभागाचे अधिकारी म्हणत असले तरी बिबट्याच्या शरीरावर किंवा घटनास्थळावर झुंजीच्या खुणा आढळून आल्या नाहीत.
सुमारे २० कि़मी. चा परिसर राखीव वनात मोडतो. वन्यपशू येथे असुरक्षित आहेत. (तालुका प्रतिनिधी)