विजेच्या धक्क्याने शेतमजुराचा मृत्यू
By admin | Published: September 21, 2015 12:21 AM2015-09-21T00:21:05+5:302015-09-21T00:21:05+5:30
शेत शिवारात गेलेल्या एका ३५ वर्षीय शेतमजुराचा विजेच्या जिवंत तारांचा स्पर्श झाल्याने जागीच मृत्यू झाला.
संतप्त नागरिकांची पोलीस ठाण्यात गर्दी : १० लाखांची मदत द्या, अड्याळ येथील प्रकार
अड्याळ : शेत शिवारात गेलेल्या एका ३५ वर्षीय शेतमजुराचा विजेच्या जिवंत तारांचा स्पर्श झाल्याने जागीच मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी ९ वाजताच्या सुमारास अड्याळ शेत शिवारात घडली. संदीप नवघडे रा. अड्याळ असे मृतकाचे नाव आहे. घटनेनंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी मृतकाच्या कुटूंबीयाला १० लाखांची मदत दयावी या मागणीवरुन पोलीस ठाण्यात एकच गर्दी केली.
माहितीनुसार अड्याळ येथील विनायक ढवळे यांच्या सोबतीला संदीप नवघडे यासह अन्यजण शेतशिवारात पिक पिकाची पाहणीकरीता गेले होते यादरम्यान शेतशिवारातील विद्युत खांबावरील जिवंत तार तुटून धानपिकात पडले होते. संदीप हा बांध्यांमधून जात असताना त्याचा पायाचा स्पर्श विजेचा जिवंत ताराचा झाला. यात त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. याची माहिती गावात पोहचताच घटनास्थळी लोकांनी एकच गर्दी केली. विद्युत विभागाने वेळेआधीच तुटलेल्या तारांची दुरुस्ती केली असती तर निष्पाप संदीपचा जीव गेला नसता, अशी नागरिकांमध्ये चर्चा होती. यानंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यात धाव घेवून संबंधीत दोषींवर कारवाई करुन मृतकाचा कुटूंबाला १० लक्ष रुपयाची तातडीची मदत दयावी अशी मागणी केली. संदीप हा घरातील एकमेव कमावता होता. त्याच्या मागे पत्नी व दोन मुली आहेत. सायंकाळी उशिरा त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. (वार्ताहर)
मंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली
महिन्याभरापूर्वी उर्जा मंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांनी जिल्हयात आढावा सभा घेवून नादुरुस्त असलेल्या विद्युत रोहित्र तथा तुटलेल्या तारांबाबत दुरुस्तीचे आदेश दिले होते. मंत्र्यांच्या आदेशाला पायदळी तुडविले काय? असे या आजच्या घटनावरुन स्पष्ट होते. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांना घरी पाठविण्यात येईल असेही बजावण्यात आले होते. या प्रकरणी शासन काय कारवाई करते याकडे अड्याळ वासीयांचे लक्ष लागले आहे.
दोषी असलेल्या संबंधितावर कारवाई करण्यात येईल. घटनेसंबंधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागरिकांची मागणी वरिष्ठांपर्यंत पोहचविण्यात येईल.
- अजाबराव नेवारे,
पोलीस निरीक्षक अडयाळ