वाघाच्या हल्ल्यात इसमाचा मृत्यू
By admin | Published: May 7, 2016 01:02 AM2016-05-07T01:02:39+5:302016-05-07T01:02:39+5:30
तीन दिवसांपासून घरून बेपत्ता असलेल्या एका इसमाचा मृतदेह गोसेखुर्द धरणाजवळ आढळून आला.
गोसेखुर्द धरणाजवळची घटना : चार दिवसांपासून घरून होता बेपत्ता
पवनी : तीन दिवसांपासून घरून बेपत्ता असलेल्या एका इसमाचा मृतदेह गोसेखुर्द धरणाजवळ आढळून आला. घटनास्थळावर वाघाच्या पायाचे ठसे आढळून आल्यामुळे त्याचा मृत्यू वाघाच्या हल्ल्यात झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
पुनर्वसित मेंढा येथील रहिवाशी प्रेमलाल आगरे (६०) असे मृतकाचे नाव आहे. ते गोसीखुर्द धरणा लगतच्या वैनगंगा नदीत मासेमारी करीत होते. २ मे रोजी ते मासेमारीसाठी घरून गेले. परंतु तीन दिवसांपासून ते घरी पोहोचले नव्हते. त्यामुळे त्यांची शोधाशोध सुरू होती. धरणाला लागून असलेल्या उमरेड-कऱ्हांडला अभयारण्याच्या पवनी वनपरिक्षेत्राच्या कंपार्टमेंट क्रमांक ३०० मध्ये छिन्नविछिन्न स्थितीत मृतदेह आढळून आला. घटनास्थळावर त्याची सायकल आणि कपड्याचे तुकडे आढळून आले. मृतदेहाच्या बाजुला वाघाचे ठसे आढळून आले. त्यावरून वाघाच्या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला. या घटनेला वनविभागाने दुजोरा दिला आहे. घटनेची माहिती मिळताच पवनी पोलीस आणि वनविभागाचे अधिकारी घटनास्थळावर पोहोचून पंचनामा करण्यात आला. (तालुका प्रतिनिधी)