वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरूणीचा मृत्यू
By admin | Published: January 4, 2017 12:39 AM2017-01-04T00:39:19+5:302017-01-04T00:39:19+5:30
दुचाकीने ट्रीपल सीट स्वार होऊन शीतलामाता मंदिरासमोरून पाण्याच्या टाकीकडे जाणाऱ्या युवतीने एका दही विक्रेत्या इसमाला धडक दिली.
शीतला माता मंदिराजवळील घटना : वाहनचालकावर गुन्हा दाखल
भंडारा : दुचाकीने ट्रीपल सीट स्वार होऊन शीतलामाता मंदिरासमोरून पाण्याच्या टाकीकडे जाणाऱ्या युवतीने एका दही विक्रेत्या इसमाला धडक दिली. यात तिघीही रस्त्यावर कोसळल्या. दरम्यान मागून येणाऱ्या भरधाव चारचाकी वाहनाच्या चाकात आलेल्या तरूणीचा मृत्यू झाला. अन्य दोघी किरकोळ जखमी झाल्या असून त्यांच्यावर जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना आज मंगळवारला दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली.
संगीता वासुदेव शहारे (१८) रा.मेंढा असे मृतक युवतीचे नाव आहे. अन्य दोन युवतींची नावे कळू शकली नाही. याप्रकरणी सदर युवती एम.एच. ३६ आर. ९८७५ या दुचाकीने तिच्या दोन मैत्रीणींसह खात रोड मार्गावरून शीतलामाता मंदिरमार्गे पाण्याच्या टाकीकडे जात होत्या. दरम्यान वळणावरून वाहनावरील नियंत्रण सुटल्याने युवतीच्या दुचाकीने समोरून येणाऱ्या एका दही विक्रेत्या इसमाला धडक दिली. त्यामुळे दुचाकीवरील तिन्ही तरूणी रस्त्यावर कोसळल्या. याचवेळी पाण्याच्या टाकीकडून भरधाव येणाऱ्या एम.एच. ३६ एफ २०३९ या वाहनाच्या चाकात संगीता शहारे आल्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. तिच्या दोन मैत्रिणी किरकोळ जखमी झाल्या आहेत. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळावर धाव घेऊन अपघातग्रस्तांना जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल केले. दरम्यान अपघाताची माहिती होताच भंडारा पोलीस घटनास्थळावर पोहोचले. या प्रकरणी भंडारा पोलिसांनी वाहन चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला असून घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक दांदडे करीत आहेत. (शहर प्रतिनिधी)