बाळंतपणानंतर महिलेचा मृत्यू
By admin | Published: December 20, 2014 12:38 AM2014-12-20T00:38:56+5:302014-12-20T00:38:56+5:30
माता बालक यांच्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी शासनाने जननी शिशु सुरक्षा योजना अंमलात आणली.
साकोली : माता बालक यांच्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी शासनाने जननी शिशु सुरक्षा योजना अंमलात आणली. साकोली तालुक्यात या योजनेचा फज्जा उडाला असून माता मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. नोव्हेंबर महिन्यात एका मातेचा मृत्यू झाला तर आज पहाटे प्रीती भारत नागमुडे (२३) या मातेच्या बाळंतपणानंतर अवघ्या काही तासातच जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाल्याची घटना घडली.
प्रीती भारत नागमुडे रा.सानगडी ही पतीसह मागील पाच महिन्यापूर्वी सानगडी येथे नातेवाईकांच्या आसऱ्याने कामाच्या शोधात आली. सानगडी येथे या दांपत्याचे पारंपारिक व्यवसाय म्हणून बांबूपासून टोपली, सुप तयार करण्याची कामे करणे सुरु केले. या दरम्यान प्रितीने आपल्या गर्भधारणेची नोंद प्राथमिक आरोग्य केंद्र सानगडी येथे केली. सानगडी येथेच वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेत होती. काल प्रितीला बाळंतपणासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र सानगडी येथे दाखल करण्यात आले. काही वेळानंतर प्रितीने एका गोंडस बाळाला जन्म दिला.
प्रितीची प्रकृती खराब झाल्याने तिला उपजिल्हा रुग्णालय साकोली येथे हलविण् यात आले. साकोली येथे काही काळ उपचारानंतर तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही म्हणून तिला तात्काळ रात्रीच जिल्हा रुग्णालय भंडारा येथे हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान पहाटे प्रितीने या जगाचा निरोप घेतला. प्रितीचा मृतदेह तिच्या मुळगावी वडसा येथे नेण्यात आला. तिथेच तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. (तालुका प्रतिनिधी)