शस्त्रक्रियेनंतर प्रसूत महिलेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2018 10:51 PM2018-03-09T22:51:19+5:302018-03-09T22:51:19+5:30
गर्भार महिलेला रक्त चढविण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. या दरम्यान वैद्यकीय अधिकाऱ्यांनी बाळाला धोका असल्याचे सांगून महिलेवर प्रसूत शस्त्रक्रिया केली. यात चुकीची नस कापल्याने अतिरक्तस्त्राव झाला.
आॅनलाईन लोकमत
भंडारा : गर्भार महिलेला रक्त चढविण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. या दरम्यान वैद्यकीय अधिकाऱ्यांनी बाळाला धोका असल्याचे सांगून महिलेवर प्रसूत शस्त्रक्रिया केली. यात चुकीची नस कापल्याने अतिरक्तस्त्राव झाला. त्यामुळे तिला नागपुरात दाखल करण्यासाठी नेत असताना वाटेतच तिची प्राणज्योत मालविली. वंदना सूर्यभान मानकर (३२)रा. मांगली, ता. लाखनी असे मृत महिलेचे नाव आहे.
चुकीची नस कापल्यानेच तिचा मृत्यू झाला, असा आरोप करीत मृत महिलेच्या पतिने संबंधितांवर कारवाई करण्याची तसेच शासन योजनेंतर्गत आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. माहितीनुसार वंदना मानकर या ३२ वर्षीय महिला ८ महिन्यांची गर्भार होती. नववा महिना लागल्यामुळे तपासणीसाठी तिला ४ मार्च रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. शरिरात रक्ताचे प्रमाण कमी असल्यामुळे तिला रक्त चढवावे लागेल, अशी सुचना डॉक्टरांनी केली. तिला बी पॉझीटिव्ह गटाचे दोन पिशव्या रक्त चढविण्यात आले. बुधवारी वैद्यकिय अधिकाºयांनी बाळाचे ठोके कमी असल्यामुळे वंदनाच्या जीवाला धोका होवू शकतो असे कारण सांगून तिच्यावर शस्त्रक्रिया करावी लागेल असे सांगितले. दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. जवळपास अडीच तास शस्त्रक्रिया झाली. वंदनाने गोंडस मुलीला जन्म दिला. बाळाचे वजन पावणे दोन किलो असून शस्त्रक्रियेदरम्यान वंदनाला अतिरक्तस्त्राव झाला आहे. त्यामुळे ति गंभीर रुपात अस्वस्थ असल्याने पुढील उपचारासाठी नागपूरला दाखल करावे लागेल असे वैद्यकिय अधिकाºयांनी सांगितले. त्यानुसार वंदनाला रुग्णवाहिकेतून नागपूरला दाखल करण्यासाठी नेत असताना वाटेतच तिची प्राणज्योत मालविली. नागपूर येथे उत्तरीय तपासणीनंतर वंदना मृतदेह कुटूंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला.
विशेष म्हणजे वंदनावर प्रसुत शस्त्रक्रिया करित असताना गर्भशयाच्या पिशविची शस्त्रक्रिया व कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया सुध्दा करण्यात आल्याचेही सुर्यभान मानकर यांनी सांगितले.
तसेच शस्त्रक्रियेपुर्वी आवश्यक असलेल्या दस्ताऐवजांवरही सुर्यभान यांची स्वाक्षरी घेण्यात आली. सध्या स्थितीत नवजात बालिकेवर जिल्हा सामान्य रुग्णालयातील एसएनसीयु विभागात उपचार सुरु असून ती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येते. या घटनेची रितसर तक्रार पालांदूर पोलीस ठाण्यात शुक्रवारी सकाळी द्यायला सुर्यभान मानकर गेले असता पोलिसांनी ही घटना आमच्या हद्दीत नाही असे बोलून तक्रार घेण्यास नकार दिला.
‘अभय’चे ममत्व हिरावले
सुर्यभान व वंदना यांच्या संसाररुपी वेलीवर ‘अभय’ नावाचे फुल उमलले. तो आता सहा वर्षांचा असून इयत्ता पहिल्या वर्गात शिकत आहे. या दाम्पत्याचे हे दुसरे मुल आहे. बुधवारी वंदनाचा दुर्देवी मृत्यू झाला. अभयला ही गोष्ट माहित होताच, काही काळासाठी तो निशब्द झाला. आता तो फक्त आई... आई! म्हणून सतत हाक मारतो. कोवळ्या वयात अभयचे ममत्व हिरावल्याने निरागस चेहºयाकडे पाषाणालाही पाझर फुटावा असे मन हेलावणारे दृष्य सध्या सुर्यभान मानकर यांच्या घरी दृष्टीस पडत आहे.
वंदना मानकर यांना वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्न डॉक्टरांनी केले. अतिरक्तस्त्राव झाल्यामुळे पुढील उपचारासाठी नागपुरला हलविण्याचा निर्णय घेतला. मात्र नियतीने साथ दिला नाही. मुख्यमंत्री सहायता निधीतून मानकर कुटुंबियाला मदत दिली जाऊ शकेल काय, यावर निर्णय घेतला जाईल.
-डॉ.रविशेखर धकाते, जिल्हा शल्यचिकित्सक भंडारा.