बसच्या धडकेत युवकाचा मृत्यू

By admin | Published: May 28, 2015 12:34 AM2015-05-28T00:34:10+5:302015-05-28T00:34:10+5:30

अपघातानंतर मृतदेह रुग्णवाहिकेत न नेता चक्क बसमध्येच टाकून साकोलीला आणण्याचा प्रयत्न केला.

Death of youth in bus crash | बसच्या धडकेत युवकाचा मृत्यू

बसच्या धडकेत युवकाचा मृत्यू

Next

नागरिकांनी केली वाहतूक ठप्प : अपघात महालगावात, आंदोलन कुंभलीत
साकोली : अपघातानंतर मृतदेह रुग्णवाहिकेत न नेता चक्क बसमध्येच टाकून साकोलीला आणण्याचा प्रयत्न केला. यामुळे संतप्त झालेल्या मृतकाच्या नातेवाईकांनी व गावकऱ्यांनी बस कुंभली येथे अडवून बसचालक व पोलिसांना निलंबित करण्यात यावी अशी मागणी केली. या दरम्यान साकोली-लाखांदूर मार्गावर दोन तास वाहतूक ठप्प राहिली. अखेर लेखी आश्वासनानंतर मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी साकोली उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले.
राजेंद्र भास्कर चुटे (२१) रा. वांगी असे मृत युवकाचे नाव आहे.
राजेंद्र हा आज दुपारी १ वाजताच्या सुमारास दुचाकीने वांगी येथून साकोली येथे असताना महालगाव जवळ साकोलीहून खोबा येथे प्रवासी घेऊन जाणाऱ्या बस एम एच ०६ एस ८८२३ ने राजेंद्रच्या दुचाकीला धडक दिली. यात राजेंद्र जागीच ठार झाला. माहिती मिळताच घटनास्थळावर पोलीस पोहोचले. मात्र पोलिसांनी घटनास्थळावर पंचनामा करता व मृतकाच्या नातेवाईकांना न सांगताच मृतदेह बसमध्ये टाकून साकोली येथे आणीत होते. या घटनेची माहिती मिळताच मृतकाचे कुटुंबीय व गावकरी यांनी तात्काळ बसचा पाठलाग करीत बस कुंभली येथे अडविले.
यावेळी राजेंद्रचे प्रेत बसमध्ये समोरच्या सिटच्या खाली ठेवले होते. त्यामुळे संतप्त नातेवाईकांनी व गावकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेत बसचालक व पोलिसांना निलंबित केल्याशिवाय उत्तरीय तपासणी करु देणार नाही, असा पवित्रा घेतला. या दरम्यान उपविभागीय पोलिस अधिकारी हिंमत जाधव हे घटनास्थळावर पोलीस कुमक घेऊन पोहोचले.
मात्र परिस्थिती चिघळत गेली. शेवटी बस आगार व्यवस्थापक व उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी लेखी आश्वासन दिल्यावर मृतदेह रुग्णवाहिकेतून नेण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)

अपघात प्रकरणाची योग्य ती चौकशी करुन दोषी पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करु.
- हिंमतराव जाधव,
उपविभागीय पोलीस अधिकारी

Web Title: Death of youth in bus crash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.