बाबासाहेबांच्या विचाराचे वैभव वाचण्याचा संकल्प करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 11:08 PM2018-04-14T23:08:38+5:302018-04-14T23:08:38+5:30
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे शक्तीस्थान ही त्यांची बुद्धीमत्ता होती. बाबासाहेबांनी प्रचंड वाचन व लिखाण केले. आपण बाबासाहेबांची जयंती साजरी करताना बाबासाहेबांची किती ग्रंथसंपदा वाचली याचा विचार करायला हवा.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे शक्तीस्थान ही त्यांची बुद्धीमत्ता होती. बाबासाहेबांनी प्रचंड वाचन व लिखाण केले. आपण बाबासाहेबांची जयंती साजरी करताना बाबासाहेबांची किती ग्रंथसंपदा वाचली याचा विचार करायला हवा. आजच्या निमित्ताने बाबासाहेबांच्या विचारांचे वैभव वाचण्याचा संकल्प केल्यास, बाबासाहेबांना हीच खरी आदरांजली ठरेल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी केले.
सामाजिक न्याय विभाग व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित समता सप्ताहाचा समारोप व अभिवादन सभेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सूर्यवंशी, जिल्हा पोलीस अधीक्षक विनीता साहू, नगराध्यक्ष सुनिल मेंढे, अप्पर पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर, सहाय्यक आयुक्त आशा कवाडे, न.प. उपाध्यक्ष आशु गोंडाणे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, समितीचे अध्यक्ष वसंत हुमने, सचिव एम.आर.राऊत, कोषाध्यक्ष महेंद्र वाहाणे, संघटक यशवंत नंदेश्वर उपस्थित होते.
सामाजिक न्याय विभागाच्या वतीने ८ ते १४ एप्रिलदरम्यान समता सप्ताह आयोजित करण्यात आला होता. या सप्ताहात शासनाच्या विविध योजना व कार्यक्रमाबाबत गावागावात जनजागृती करण्यात आली. समता सप्ताहाचा समारोप करण्यात आला. सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्रिमूर्ती चौकातील पुतळयाला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करून मानवंदना देण्यात आली. यावेळी बार्टीच्या समतादुतांनी जागर संविधानाचा यावर पथनाट्य सादर करून संविधानाची महती सांगितली. यावेळी जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने महामानव हे पुस्तक व लोकराज्य स्टॉल लावण्यात आला होता. या स्टॉलला विविध क्षेत्रातील मान्यवर, अधिकारी, समितीच्या सदस्यांनी भेटी देऊन पाहणी केली.