ठरले ! महाविकास आघाडीकडून अखेर तुमसरात चरण वाघमारे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2024 11:21 AM2024-10-25T11:21:08+5:302024-10-25T11:22:41+5:30
राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून लढणार : आता लक्ष पुढील हालचालीकडे
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : तुमसर विधानसभा मतदार संघातून अखेर महाविकास आघाडीकडून उमेदवार म्हणून माजी आमदार चरण वाघमारे यांच्या नावाची घोषणा झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ते उमेदवार असतील. महाविकास आघाडीतील स्थानिक नेत्यांच्या प्रचंड विरोधानंतरही ही उमेदवारी जाहीर झाल्याने आता सर्वांचे लक्ष पुढील हालचालींकडे लागले आहे.
चरण वाघमारे यांनी गेल्या पंधरवाड्यात मुंबईत जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) मध्ये प्रवेश घेतला होता. त्यांच्या या प्रवेशापासनच येथील महाआघाडीचे तिकीट त्यांना पक्के असल्याचे मानले जात होते. मात्र त्यांच्या उमेदवारीला स्थानिक स्तरातून प्रचंड विरोध सुरू झाला होता. या पार्श्वभूमीवर महाआघाडीतील स्थानिक नेत्यांनी मुंबईत जाऊन पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या भेटीही घेतल्या होत्या. मात्र या प्रयत्नांना यश आले नाही. अखेर राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेत्यांनी आपल्या निर्णयावर ठाम राहून ही उमेदवारी जाहीर केलीच.
सुप्रिया सुळे नेत्यांची नाराजी दूर करणार
तुमसर : विधानसभा मतदारसंघात माजी आमदार चरण वाघमारे यांना शरद पवार गटाच्या उमेदवारीला महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांचा विरोध असला तरी उमेदवारीचा अखेरपर्यंत फेरविचार झालाच नाही. दरम्यान खासदार सुप्रिया सुळे नाराज नेत्यांची भेट घेऊन नाराजी दूर करणार असल्याची माहिती आहे.
महायुतीकडून अजित पवार गटाने या मतदारसंघात विद्यमान आमदार राजू कारेमोरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. महाविकास आघाडीत मात्र राजकीय नाट्य बघावयास मिळत आहे. काँग्रेस व शरदचंद्र पवार गटातील स्थानिक नेत्यांचा चरण वाघमारे यांना विरोध कायम आहे. वाघमारे यांचा नामांकन अर्ज भरण्याकरिता खासदार सुप्रिया सुळे येणार असून त्या नेत्यांची नाराजी दूर करतील, अशी शक्यता आहे. वाघमारे यांच्याकडून नामांकन दाखल करण्याची तारीख ठरायची आहे.