भंडाराच्या राजाची यावर्षी मूर्ती चार फुटाची साकारण्याचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2020 05:00 AM2020-07-26T05:00:00+5:302020-07-26T05:01:28+5:30
भंडाराचा राजा मंडळाचे यंदा १५ वे वर्ष आहे. मंडळाने गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबविले आहे. परंतु यंदा कोरोना प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर मंडळाने सर्व सांस्कृतिक कार्यक्रम व सामाजिक उपक्रम रद्द केले आहेत. मूर्तीच्या उंचीबाबत शासन निर्णयाच्या अधिन राहून निर्णय घेण्याचे मंडळाने या आधीच जाहीर केले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : दरवर्षी भंडाराच्या राजाचे लोभस रुप पाहण्यासाठी भक्तांचे डोळे आसूसलेले असतात. विविध सामाजिक उपक्रमांसह सांस्कृतिक कार्यक्रमामुळे भंडाराचा राजा शहरातच नव्हे तर जिल्ह्यात नावारुपास आला आहे. मात्र यावर्षी कोरोना संसर्गामुळे गणेशोत्सव अगदी साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय मंडळाने घेतला असून भंडाराच्या राजाची मूर्ती यंदा चार फुटाचीच साकारणार आहे. मंडळाच्या देव्हाऱ्यातील पारंपारिक पद्धतीने गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे.
भंडाराचा राजा मंडळाचे यंदा १५ वे वर्ष आहे. मंडळाने गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबविले आहे. परंतु यंदा कोरोना प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर मंडळाने सर्व सांस्कृतिक कार्यक्रम व सामाजिक उपक्रम रद्द केले आहेत. मूर्तीच्या उंचीबाबत शासन निर्णयाच्या अधिन राहून निर्णय घेण्याचे मंडळाने या आधीच जाहीर केले होते. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत धार्मिक बाब, चिंतामणी भक्त, शासन यंत्रणा, पोलीस यंत्रणा व जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीचा विचार करून मंडळाच्या आदर्शवादी भूमीकेची जाण ठेवून यंदा गणरायाची चार फुटाचीच मूर्ती साकारली जाणार आहे. गणेशोत्सवाच्या काळात फिजीकल डिस्टन्सिंगचे पालन केले जाणार असून कोरोना जनजागृतीबाबतही मंडळाने पुढाकार घेतला आहे. गणेशोत्सवाच्या परंपरेला खंडीत न होऊ देता मंडळाने हा निर्णय घेतला आहे. जनसेवा हीच ईश्वरसेवा यानुसार मंडळ यावर्षी उत्सव साधेपणाने साजरा करीत असून जनतेकडून सहकार्याची अपेक्षा मंडळाचे अध्यक्ष मंगेश वंजारी यांनी केली आहे.
भंडाराचा राजाचा दरवर्षी थाट काही ओरच असतो. येथील गांधी चौक परिसरातील गुजरीत विशाल मंडपात बाप्पा विराजमान होतात. भाविकांची येथे गणेशोत्सवाच्या काळात रिघ लागलेली असते. सामाजिक आणि धार्मीक उपक्रम राबविण्यात अव्वल ठरलेला भंडाराचा राजा यंदा मात्र भंडारेकरांना लघुरुपात दर्शन देणार असल्याचे मंगेश वंजारी यांनी सांगितले.