पहिल्या दिवशी शाळा बंदचा निर्णय तूर्तास मागे
By Admin | Published: June 24, 2017 12:24 AM2017-06-24T00:24:59+5:302017-06-24T00:24:59+5:30
मागील काही महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या प्रकरणांमुळे जिल्हा परिषद शिक्षकांनी २७ जूनला शाळा उघडायच्या नाही, असा निर्णय घेतला होता.
जि.प. प्रशासनाचे आश्वासन : आमदार चरण वाघमारे यांनी केली मध्यस्थी
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : मागील काही महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या प्रकरणांमुळे जिल्हा परिषद शिक्षकांनी २७ जूनला शाळा उघडायच्या नाही, असा निर्णय घेतला होता. मात्र आज आ. चरण वाघमारे यांच्या मध्यस्थीने जिल्हा परिषद प्रशासनाने अशा मागण्या निकाली काढण्याचे आश्वासन दिले. यामुळे पहिल्या दिवशी शाळा बंद ठेवण्याचा तिढा आता सुटला आहे.
शासकीय विश्रामगृह येथे पार पडलेल्या या बैठकीला आ. वाघमारे यांच्यासह उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा ठवकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मातकर, शिक्षणाधिकारी (प्राथ.) मोहन चोले, जिल्हा परिषद विरोधी पक्षनेते अरविंद भालाधरे, डॉ. उल्हास फडके, भंडारा पंचायत समिती सभापती प्रल्हाद भुरे आदी यावेळी उपस्थित होते. मागील काही महिन्यांपासून शिक्षक संघटनांना केवळ आश्वासने दिली जात होती. मात्र त्यांच्या समस्या निकाली निघाल्या नाही. दरम्यान त्यांनी जिल्हास्तरावर मोठे आंदोलन केले. यावेळी खा. नाना पटोले व आ. चरण वाघमारे यांच्या पुढाकाराने तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर यांनी आंदोलनस्थळी भेट देवून शिक्षकांच्या समस्या आठ दिवसात सोडविण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर शिक्षकांचे आंदोलन थांबले होते.
मात्र त्यानंतर आश्वासना पलिकडे शिक्षकांना काहीही मिळाले नाही. दरम्यान त्यांनी शिक्षक कृती समितीच्या माध्यमातून अनेकदा जि.प. प्रशासनाशी चर्चा करण्यात आली. मात्र त्यांच्या समस्या निकाली निघाल्या नाही. त्यामुळे यावर्षीच्या शैक्षणीक सत्राच्या पहिल्या दिवशीच शाळा उघडायचीच नाही, असा निर्णय शिक्षक कृती समितीने घेतला होता. त्यामुळे प्रशासनाने शिक्षकांच्या समस्या सोडविण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या होत्या.
शुक्रवारी शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या तातडीच्या बैठकीत आ. चरण वाघमारे यांनी पुढाकार घेवून शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत चर्चा केली.
दरम्यान त्यांनी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली व जि.प. प्रशासनाने शिक्षकांच्या समस्या तातडीने सोडविण्याचे निर्देश दिले. यावेळी शिक्षक कृती समितीने मिळालेल्या आश्वासनामुळे २७ जूनचे शाळा बंदचे आंदोलन तुर्तास मागे घेण्यात आले आहे. या बैठकीला शिक्षक कृती समितीचे मुबारक सैय्यद, धनंजय बिरणवार, ओमप्रकाश गायधने, ईश्वर नाकाडे, ईश्वर ढेंगे, वसंत साठवणे, जयंत उपाध्य, सुधीर वाघमारे, सुधाकर ब्राम्हणकर, हरकिसन अंबादे, रमेश परधीकार, संदीप वहिले, युवराज वंजारी, मुकूंद ठवकर आदींची उपस्थिती होती.
ठवकर यांनी घेतला पुढाकार
उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून मंजुषा ठवकर यांनी या महिन्यातच जबाबदारी सांभाळली आहे. दरम्यान शिक्षकांनी शाळा बंदचा इशारा दिल्याचे वृत्त "लोकमत"ने प्रकाशित केल्यानंतर मंजुषा ठवकर यांनी शिक्षण विभागाला निर्देश देऊन शिक्षकांच्या समस्यांची फाईल तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश दिले होते.
जिल्हा परिषद शिक्षकांनी प्रलंबित प्रकरणांवर पहिल्या दिवशी शाळा बंदचा इशारा दिला होता. त्यामुळे शाळा बंद न ठेवता त्या सुरू रहाव्या यासाठी प्रयत्नशिल होते. त्यांचे प्रलंबित प्रकरण निकाली काढण्याबाबत शिक्षण विभागाला निर्देश देण्यात आलेले आहे. सर्व प्रलंबित प्रश्न निश्चित तातडीने निकाली निघतील.
-मंजुषा ठवकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य), जि.प. भंडारा.