कुजलेल्या अवस्थेत बिबट्याचा मृतदेह आढळला; लाखांदूर येथील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2022 01:00 PM2022-07-23T13:00:06+5:302022-07-23T13:07:56+5:30
या बिबट्याचा मृत्यू आठ दिवसांपूर्वी झाला असावा, असा संशय व्यक्त वनविभागाने व्यक्त केला.
लाखांदूर (भंडारा) : बंद असलेल्या साखर कारखान्याच्या इमारतीत कुजलेल्या अवस्थेत मादी बिबट्याचा मृतदेह आढळून आला. ही बाब शुक्रवारी दुपारी ४ वाजता लाखांदूर येथे उघडकीस आली. या बिबट्याचामृत्यू आठ दिवसांपूर्वी झाला असावा, असा संशय व्यक्त वनविभागाने व्यक्त केला.
लाखांदूर येथे नॅचरल ग्रोवर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा साखर कारखाना आहे. तो सात वर्षांपासून बंद आहे. शुक्रवारी दुपारी कारखान्याच्या सुरक्षा रक्षकांना कारखान्यातून दुर्गंधी येत असल्याचे लक्षात आले. त्यांनी शोध घेतला असता मिलिंग सेक्टर भागात बिबट्याचा मृतदेह आढळला. साखर कारखान्यात बिबट्याचा मृतदेह आढळून आल्याची माहिती लाखांदूर पोलिसांसह वनविभागाला देण्यात आली.
लाखांदूरचे वनपरिक्षेत्राधिकारी रूपेश गावित, क्षेत्र सहायक आय. जी. निर्वाण यांच्यासह पोलीस नाईक दिलीप भोयर, पोलीस अंमलदार अनिल राठोड घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. वाघाडे, डॉ. प्रशांत चौधरी, डॉ. सोनवाने यांना पाचारण करण्यात आले. मृतावस्थेत आढळलेला मादी बिबट सुमारे चार ते पाच वर्ष वयाचा असल्याचे पुढे आले. मृतदेहाचा पंचनामा करीत शवविच्छेदन केले आहे.