भूगर्भातील पाण्याच्या पातळीत २० फुटांची घट
By Admin | Published: March 11, 2017 12:26 AM2017-03-11T00:26:31+5:302017-03-11T00:26:31+5:30
मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच भूगर्भातील पाण्याची पातळी १५ ते २० फूटाने घटली आहे. नैसर्गिक जलस्त्रोतांवर त्याचा परिणाम जाणवत आहे.
विहिरी, तलाव कोरडे : उपाय योजना व बोअरवेलवर बंदीची गरज
करडी (पालोरा) : मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच भूगर्भातील पाण्याची पातळी १५ ते २० फूटाने घटली आहे. नैसर्गिक जलस्त्रोतांवर त्याचा परिणाम जाणवत आहे. गावातील विहिरी कोरड्या पडल्या आहेत. पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. त्यावर उपाययोजना न झाल्यास, जलसंसाधनाची कामे न झाल्यास परिस्थिती गंभीर वळण घेण्याची शक्यता आहे. ४०० फुटांपर्यंत खोल खोदल्या जाणाऱ्या बोअरवेलवरही प्रतिबंध लावण्यासाठी विचार करावा लागणार आहे.
मोहाडी तालुक्यातील करडी परिसर कोरडवाहू क्षेत्रात मोडतो. या परिसरात सुमारे ३२ हजार हेक्टर आर शेती विविध पिकांखाली आहे. खरीपातील भाताचे पीक घेतल्यानंतर जमीन पडीत राहते. वैनगंगा नदीच्या पूर्वेला जवळपास १ ते ७ किमीच्या क्षेत्रात परिसराचा विस्तार आहे. सुमारे २५ गावांतील ४५ हजार लोकसंख्या या भागात असून शेती हाच प्रमुख व्यवसाय आहे. या भागावर निसर्गाने अन्याय केला आहे. वैनगंगा नदी व विस्तीर्ण जंगलाच्या मध्यभागी परिसर असताना भुगर्भात पाण्याचा साठा अत्यल्प आहे. लहान मोठ्या तलाव व बोड्यांची संख्या अधिक असताना गजबजलेल्या आहेत. अतिक्रमणामुळे तलावातील पाण्याची साठवण क्षमता बेताची आहे.
वन्यजीव अभयारण्य व व्याघ्र प्रकल्पामुळे जंगलावर आधारित उद्योग बंद झाले आहेत. त्यामुळे बेरोजगारीची भिषण समस्या उभी ठाकली आहे. सिंचनाच्या कोणत्याही सुविधा नसल्याने दरवर्षी कोरड्या दुष्काळाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो.
यावर्षी खरिपात अत्यल्प पाऊस झाला. त्यामुळे रोवणीची कामे खोळंबली. पुरेसा पाऊस पडला, त्यावेळी धान रोपांचा कालावधी दीड ते दोन महिन्यांनी वाढला. पाऊसाच्या खोळंब्यामुळे परिसरातील शेती रोवणी अभावी पडीत राहिली. मध्यंतरी पडलेला पाऊस शेवटी बेपत्ता झाल्याने उत्पन्नात मोठी घट झाली. कर्जाच्या रक्कमेतून मात्र, सक्तीने पीक विम्याची रक्कम कपात करण्यात आली. मागील वर्षी सुध्दा शेतीला दुष्काळाचा फटका बसला.
यावर्षी कमी पडलेल्या पावसाचा परिणाम आता सर्वांना सहन करावा लागत आहे. तलाव, बोळ्या मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच कोरड्या पडल्या. शेतातील विहिरी बरोबर गावातील विहिरी आटल्या. गावासभोवती २५० ते ३०० फुटापर्यंत खोदल्या गेलेल्या तसेच अनिर्बंध पाण्याच्या उपस्यामुळे तर परिस्थिती भिषण झाली आहे. महिलांना ३ ते ४ किंमीवरुन पाणी घरी आणावे लागत आहे. (वार्ताहर)
एकात्मिक पाणलोट कार्यक्रम थंडबसत्यात
दोन वर्षाअगोदर परिसराला एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रमात समाविष्ट करण्यात आले. जलसंसाधनाची कामे करण्याची ग्वाही देण्यात आली. परंतू डीपीआर मंजुरीअभावी कामे रखडली आहेत. वर्षभरातून डिपीआर मंजुरीसाठी वरिष्ठ स्तरावर पाठविण्यात आल्याचे संबंधित विभागाकडून सांगण्यात येते. मोठा गाजावाजा करीत पाणलोट सचिवांच्या निवडीसाठी गावागावात ग्रामसभा गाजल्या. वादविवाद झाले. पंरतू कामाना उशिर का होत आहे, याचा जाब शासन प्रशासनाला विचारण्याची व त्यासाठी कठोर भुमिका घेण्याची काळजी घेण्यात आली नाही. परिणाम कामे थंडबस्त्यात पडली आहेत.
जलयुक्त शिवार योजनेकडून मोठी अपेक्षा
शासनाचा जलसंसाधनाचा साठी तयारी योजना म्हणून जलयुक्त शिवार योजनेकडे पाहिले जाते. कोरड्या दुष्काळावर मात करण्यासाठी यावर्षी शासनाचे वतीने परिसरातील गावाचा समावेश जलयुक्त शिवार योजनेसाठी करण्यात आला. जलयुक्त शिवारातून पाण्याच्या नैसर्गिक साठ्यांचे बळकटीकरण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. याशिवाय कृत्रीम तलाव निर्मितीलाही संधी आहे. आवश्यकता आहे ती नागरिकांच्या सुक्ष्म नियोजनाची व आवश्यक गरजांना प्राधान्य देण्याची. त्या दिशेने गावांनी पावले उचलल्यास जलसंसाधनाची मोठी कामे गावात होवून काही प्रमाणात का होईना पाण्याच्या समस्येवर मात करता येणार आहे.