रुग्ण कमी झाले म्हणजे कोरोना गेला नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 05:00 AM2021-09-09T05:00:00+5:302021-09-09T05:00:31+5:30
रुग्ण कमी झाल्याने ब्रेक द चेनअंतर्गत निर्बंध शिथिल झाले. बाजारपेठ रात्री १० वाजेपर्यंत उघडी असते. आता सध्या सण-उत्सवाचा काळ सुरू झाला आहे. बाजारात नागरिक गर्दी करीत आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर हे सर्व धोकादायक आहे. तिसरी लाट आल्यास परिणाम सर्वांनाच भोगावे लागणार आहे. दुसऱ्या लाटेचा अनुभव असतानाही नियमांना पायदळी तुडविले जात आहे.
ज्ञानेश्वर मुंदे
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : दुसरी लाट ओसरल्यानंतर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली. राज्यात कोरोनामुक्त होणारा पहिला जिल्हा ठरला. मात्र, रुग्ण कमी झाले म्हणजे कोरोना गेला असे नाही. महानगरात रुग्ण वाढत आहेत. तिसऱ्या लाटेचे ते संकेत आहेत. सण-उत्सव साजरे करताना नियम पायदळी तुडविणे धोक्याचे ठरू शकते. कोरोना नियमांच्या पालनासोबतच लसीकरण आवश्यक आहे, असा सल्ला जिल्हा प्रशासन वारंवार देत आहे. त्यानंतरही नागरिक बेफिकीरीने वागत आहेत. ही सर्वांसाठी धोक्याची घंटा आहे.
रुग्ण कमी झाल्याने ब्रेक द चेनअंतर्गत निर्बंध शिथिल झाले. बाजारपेठ रात्री १० वाजेपर्यंत उघडी असते. आता सध्या सण-उत्सवाचा काळ सुरू झाला आहे. बाजारात नागरिक गर्दी करीत आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर हे सर्व धोकादायक आहे. तिसरी लाट आल्यास परिणाम सर्वांनाच भोगावे लागणार आहे. दुसऱ्या लाटेचा अनुभव असतानाही नियमांना पायदळी तुडविले जात आहे.
दीड लाख लसीकरणाचे उद्दिष्ट
जिल्ह्यात लसीकरण मोहीम वेगात सुरू आहे. आगामी १५ दिवसात दीड लाख नागरिकांचे लसीकरण करण्याची मोहीम जिल्हा आरोग्य यंत्रणेने हाती घेतली आहे. जास्तीत जास्त नागरिकांना लस देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
मुलांसाठी आयसीयू
लहान मुलांना कोरोना झाला तर त्यांच्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात सुसज्ज अशा आयसीयू कक्षाची व्यवस्था करण्यात आली आहे. लहान मुलांवर उपचारासाठी नागपूर येथे नुकतेच प्रशिक्षण पार पडले. आशावर्करांनाही प्रशिक्षण देण्यात आले आहे. ग्रामीण आरोग्य यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. नागरिकांनी कोरोना नियमांचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे.
कोणताही ताप अंगावर काढू नका
- सध्या कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात असली तरी बाहेरगावावरून येणाऱ्यांनी आपली आरटीपीसीआर चाचणी करणे गरजेचे आहे. कोणताही ताप अंगावर काढू नये. डेंग्यू मलेरिया आणि कोरोना यांची लक्षणे सारखीच आहेत. डेंग्यू मलेरियाची चाचणी निगेटिव्ह आल्यास कोरोनाची चाचणी करावी. ताप अंगावर काढू नये. सर्दी, खोकला असेल तर सेल्फ क्वारंटाइन व्हावे, असा सल्ला आरोग्य यंत्रणा देत आहे.
लसीकरण हाच एकमेव उपाय
- जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोना लसीकरण सुरू आहे. पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या सहा लाख ६२ हजार आहे, तर दुसरा डोस एक लाख ८६ हजार व्यक्तींनी घेतला आहे. आजही अनेकजण लसीकरणासाठी पुढे येत नाही. कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना कोरोना झाला तरी त्यांना रुग्णालयात भरती व्हायची वेळ येणार नाही आणि मृत्यू तर निश्चितच होणार नाही, असे सांगितले जाते. त्यामुळे नागरिकांनी लसीकरण करणे गरजेचे आहे. जिल्ह्यात सर्वत्र लसीकरण सुविधा उपलब्ध आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयासह ठिकठिकाणी दररोज लसीकरण होत आहे.
आरोग्यविषयक उपक्रमांना प्राधान्य द्या
सध्या सर्व ठिकाणी उत्सवाचे पर्व आहे. येणाऱ्या काळात गणेशोत्सव, गौरी, दुर्गोत्सव, दसरा, दिवाळी हे सण येत आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर हे सर्व सण-उत्सव साधेपणाने, नियमांचे पालन करून साजरे होणे आवश्यक आहे. केरळमध्ये ओणमनंतर मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढली. आपल्या जिल्ह्यात रुग्णसंख्या कमी असली तरी धोका टळला नाही. उत्सवात गर्दीच्या कार्यक्रमांऐवजी आरोग्यविषयक उपक्रमांना प्राधान्य द्यावे. कोरोना, मलेरिया, डेंग्यू व इतर आजार व त्याचे प्रतिबंधात्मक उपाय करण्यासोबतच लसीकरणाबाबत जनजागृती करावी.
संदीप कदम, जिल्हाधिकारी, भंडारा
कोरोना गेला नाही, हे लक्षात असू द्या. रुग्ण कमी झाले म्हणजे कोरोना संपला असे नाही. नागपुरात कोरोना रुग्ण काही दिवसांपासून वाढत आहेत. त्यानंतर आपल्या जिल्ह्यातही रुग्ण वाढण्याची शक्यता आहे. मास्क, फिजिकल डिस्टन्सिंग आवश्यक आहे.
-डाॅ.रियाज फारुकी,
जिल्हा शल्यचिकित्सक, भंडारा
मास्कचा वापर, लसीकरण, फिजिकल डिस्टन्सिंग आणि गर्दीत जाणे टाळावे ही चतु:सुत्री अमलात आणली तर कोरोनाचा धोका नाही. ताप, खोकला, डायरिया आदी लक्षणे दिसत असल्यास तात्काळ तपासणी करावी. ताप अंगावर काढु नये.
डाॅ.प्रशांत उईके,
जिल्हा आरोग्य अधिकारी, भंडारा