इंधन दरवाढीने ऑटोरिक्षा चालकांपुढे कुटुंबाचा गाडा ओढण्याचा गहन प्रश्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 05:00 AM2021-02-14T05:00:00+5:302021-02-14T05:00:27+5:30
भंडारा रोड रेल्वे स्थानकावर शेकडो ऑटोरिक्षा प्रवाशांची प्रतीक्षा करीत उभे असतात. ११ महिन्यांपासून या रिक्षा बंद असल्यासारख्या आहेत. प्रवाशांच्या गर्दीने ओसंडून वाहणारी रिक्षा आता प्रवाशांसाठी वणवण फिरत आहे. वाहतूक व्यवस्था पूर्वपदाला येत असली तरी ऑटोरिक्षा चालकांची परिस्थिती सुधारताना दिसत नाही. संकटाच्या काळात रोजी पडत नसल्याने ऑटोरिक्षा व्यावसायिक संकटात सापडत आहेत.
तथागत मेश्राम
लोकमत न्यूज नेटवर्क
वरठी : प्रवासी वाहतूक करणारी वाहने प्रवाशांसाठी जीवनवाहिनीचे काम करतात. कार्यालयीन प्रवास असो की विद्यार्थी वाहतूक सुरक्षेची खात्री आणि सुनियोजित ठिकाणी पोहचण्याचे उत्तम साधन अशी ओळख आहे. मात्र गतवर्षी कोरोना महासंकट आणि आता इंधन दरवाढीने ऑटोरिक्षा व्यावसायिक संकटात सापडले आहेत. कुटुंबाचा गाडा कसा हाकावा, असा गहन प्रश्न त्यांच्यापुढे पडला आहे. अनेकांना आता मोलमजुरी करण्याची वेळ आली आहे.
भंडारा रोड रेल्वे स्थानकावर शेकडो ऑटोरिक्षा प्रवाशांची प्रतीक्षा करीत उभे असतात. ११ महिन्यांपासून या रिक्षा बंद असल्यासारख्या आहेत. प्रवाशांच्या गर्दीने ओसंडून वाहणारी रिक्षा आता प्रवाशांसाठी वणवण फिरत आहे. वाहतूक व्यवस्था पूर्वपदाला येत असली तरी ऑटोरिक्षा चालकांची परिस्थिती सुधारताना दिसत नाही. संकटाच्या काळात रोजी पडत नसल्याने ऑटोरिक्षा व्यावसायिक संकटात सापडत आहेत. भंडारा रोड रेल्वे स्थानकावर २५० परवानाधारक आणि ग्रामीण भागात ५० ऑटोरिक्षा धावतात. कोरोनाच्या काळापासून हा व्यवसाय कुलूपबंद झाला आहे. अशीच अवस्था तालुका आणि जिल्हास्तरावरील ऑटोरिक्षा चालकांची आहे. दिवसभर एका ठिकाणी उभे राहूनही प्रवासी मिळत नाही. त्यामुळे अनेक ऑटोरिक्षाचालक बसस्थानकाभोवती घिरट्या घालतात. प्रवाशांच्या विणवण्या करतात. परंतु दाद मिळत नाही. आता काही जण रोजंदारीवर तर काही जण बांधकाम कामावर जाताना दिसत आहेत.
दरवाढीचा व्यवसायावर परिणाम झाला काय
कोरोनाने प्रवाशांची वानवा आणि पेट्रोलची दरवाढ घाम फोडणारी आहे. रिकामा ऑटोरिक्षा घेऊन भंडारा रोड रेल्वे स्थानकाबाहेर तासनतास बसूनही प्रवासी मिळत नाहीत. आता अनेक जण भाजीपाला व इतर पर्यायी व्यवसायात जात आहेत. परंतु त्यात जम बसणे सर्वांनाच शक्य नाही.
पैसे उरत नसल्याने करावे लागते इतर काम
भंडारा रोड रेल्वेस्थानकावर भंडारासाठी जवळपास २५० परवानाधारक ऑटोरिक्षा आहेत. कोरोना काळापासून व्यवसाय बंद आहेत. प्रवासी रेल्वेगाड्या रोडावल्याने भाडे मिळत नाही. अनेक जण रोजमजुरी करीत आहेत. तर काही जण बांधकाम मजूर म्हणून कामावर जात असल्याचे चित्र आहे.
कोरोना महासंकटातून आता सावरायला लागलो तर पेट्रोलचे दर १०० रुपयावर पोहचले. त्यामुळे भाडे परवडत नाही. सुरुवातीला भाजीपाला विक्रीचा व्यवसाय थाटला पण आता तोही बंद आहे. प्रवासी मिळत नाहीत. आता काय करावे, असा प्रश्न आहे.
-गुरुदेव बोंद्रे, ऑटोचालक
ऑटोरिक्षा व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. संपूर्ण आयुष्य ऑटोरिक्षा चालविण्यात गेले. दुसऱ्या व्यवसायात मन रमत नाही. परंतु आता प्रवाशांची संख्या रोडावल्याने दिवसभर प्रवासी मिळत नाहीत. शासनाने रिक्षाचा टॅक्स माफ करून आर्थिक मदत द्यावी.
-संजय हटवार, ऑटोचालक
ऑटोरिक्षा व्यवसायावर २० वर्षांपासून कुटुंब चालवत होतो. अचानक व्यवसायावर गंडांतर आले. पेट्रोलचे भाव आकाशाला भिडत आहेत. त्यामुळे प्रवासी भाडे परवडत नाही. परंतु पर्याय नसल्याने काहीच करता येत नाही. सकाळपासून रस्त्यावर उभे राहूनही प्रवासी शोधून सापडत नाही. सापडले तर भाव परवडत नाही.
-सरोज रामटेके, ऑटोचालक