भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द कालव्यात पडलेल्या सांबराला जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 10:10 AM2018-01-20T10:10:50+5:302018-01-20T10:11:13+5:30
पाण्याच्या शोधार्थ आलेले एक सांबर गोसीखुर्द धरणाच्या उजव्या कालव्यात पडले. ही घटना शुक्रवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा: पाण्याच्या शोधार्थ आलेले एक सांबर गोसीखुर्द धरणाच्या उजव्या कालव्यात पडले. ही घटना शुक्रवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास घडली.
माहिती मिळताच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटना स्थळी पोहचून वन्यप्रेमींच्या मदतीने कालव्यात पडलेल्या सांबराला तीन तासांच्या अथक परिश्रमानंतर काढले. बेलघाटा वॉर्डालगत कालव्याच्या पुलाजवळ सांबर पडल्याची माहिती गावकऱ्यांना मिळाली. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी दोरखंड, जाळी व इतर साहित्य घेऊन कालव्याकडे धाव घेतली. दोर व जाळीच्या सहाय्याने मदतीने त्याला कालव्याच्या बाहेर काढण्यास सुरुवात केली.
मात्र गावकऱ्यांच्या गर्दी व गोंगाटामुळे दोनदा पाण्याबाहेर काढलेले सांबर पुन्हा कालव्यात कोसळले. अखेर त्याला बाहेर काढून उमरेड - पवनी- कऱ्हांडला अभयारण्याच्या गायडोंगरी तलाव परिसरात सोडण्यात आले. सदर रेस्क्यू आॅपरेशनात वनविभागाचे वनपाल डी. टी. नंदेश्वर, कोरंभीचे वनरक्षक किशोर कोहाट, वनरक्षक मारोती केंद्रे , सारंग शिंदे वनरक्षक, पी. व्ही. शिंदे, भानुप्रतापसिंह तोमर, रामचंद्र कुर्झेकर अशोक बोरकर, महादेव शिवरकर, संघरत्न धारगावे, मयुर रेवतकर, विपीन तलमले, महेंद्र नागले, पंकज पचाल, समिर चव्हाण, आकाश दहिवले, पंकज दहिवले, पंकज तलमले, छगन डाहारे, दिनेश डाहारे, उमेश शेंडे, सतीश जांभुळकर यांनी सहभाग घेतला.