देव्हाडी उड्डाणपुलाला पडले मोठे भगदाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2019 12:58 AM2019-08-13T00:58:57+5:302019-08-13T00:59:11+5:30

देव्हाडी येथील उड्डाणपूलाला पुन्हा मोठे भगदाड पडल्याचे प्रकरण समोर आले आहे. रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या उड्डाणपूल पोचमार्गावर रविवारी भगदाड पडल्याचे उघडकीस आले. संततधार पावसात मोठ्या प्रमाणात भरावातील राख येथे वाहून गेली.

Deewadi flyover collapses | देव्हाडी उड्डाणपुलाला पडले मोठे भगदाड

देव्हाडी उड्डाणपुलाला पडले मोठे भगदाड

googlenewsNext
ठळक मुद्देकंत्राटदाराची सारवासारव : शासन, प्रशासनाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : देव्हाडी येथील उड्डाणपूलाला पुन्हा मोठे भगदाड पडल्याचे प्रकरण समोर आले आहे. रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या उड्डाणपूल पोचमार्गावर रविवारी भगदाड पडल्याचे उघडकीस आले. संततधार पावसात मोठ्या प्रमाणात भरावातील राख येथे वाहून गेली. त्यानंतर तिथे भगदाड पडले. सोमवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास येथील कंत्राटदाराने वायब्रेटर मशीनने ते भगदाड बुजविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. वारंवार उड्डाणपूलाला भगदाड पडत असल्याने पूल बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. जिल्हा प्रशासन तथा राज्य शासन येथे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे.
तुमसर- गोंदिया राष्ट्रीय महामार्गावर जागतिक बँक प्रकल्पाकडून देव्हाडी येथे रेल्वे फाटकावर उड्डाणपूलाचे काम सुरु आहे. तुमसर- रामटेक उड्डाणपूल पोचमार्गावर पुन्हा मोठे भगदाड पडल्याची घटना रविवारी सायंकाळी उघडकीस आली. काही तरुण उड्डाणपूल पोचमार्गावर फिरायला गेले तेव्हा त्यांना मोठे भगदाड पडल्याचे दिसले. त्यांनी सदर भगदाडाचे चित्रीकरण करुन सोशल मिडीयावर शेअर केले. त्यामुळे एकच खळबळ माजली.
सोमवारी सकाळदरम्यान कंत्राटदाराने वायब्रेटर मशीनने मलबा घालून भगदाड बुजविला. सदर उड्डाणपूलावर वारंवार मोठे भगदाड पडणे सुरुच आहे. उड्डाणपूलावरुन वाहतूक सुरु झाल्यानंतर पूलावरुन वाहतूक करणे येथे धोक्याचे ठरणार तर नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे. जिल्हा प्रशासनाने येथे गंभीर दखल घेऊन तज्ज्ञांमार्फत संपूर्ण पुलाची तपासणी करण्याची गरज आहे.
संबंधित विभागाचे अधिकारी येथे दहा दिवसापूर्वी आले होते. त्यांनी पाहणी करुन जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर केला. वायब्रेटरने राखेवर दाब देऊन ती भरण्यात येईल असे स्थानिकांना संबंधित विभागाचे कार्यकारी अभियंता बांधवकर यांनी सांगितले. पुन्हा दहा दिवसानंतर पूर्वी पडलेल्या स्थळपासून अवघ्या २० फुटावर पुन्हा मोठे भगदाड पडले. त्यामुळे सदर उड्डाणपूलावरुन वाहतुक करणे धोक्याचे ठरण्याची शक्यता येथे नाकारता येत नाही.
संपूर्ण पूलात राखेचा भराव करण्यात आला आहे. पावसात पाण्यासह ती राख वाहून जात आहे. त्यामुळे पुल पोकळ होत आहे. विना वाहतुकीने मोठे भगदाड येथे सातत्याने पडत आहेत. तांत्रिक बिघाड या पूलात निर्माण झाल्याची शक्यता अधिक आहे. परंतु त्याची दखल येथे प्रशसन का घेत नाही हा संशोधनाचा विषय आहे. जिल्हाधिकारी डॉ. नरेश गिते यांनी किमान गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता खुशाल नागपूरे, स्टेशनटोलीचे माजी सरपंच श्याम नागपूरे, प्रदीप बोंदरे यांनी केली आहे.

Web Title: Deewadi flyover collapses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.