बधीर प्रशासनामुळे कमकासूरवासीयांची ‘दिवाळी अंधारात’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 11:18 PM2017-10-23T23:18:40+5:302017-10-23T23:18:52+5:30
५ आॅक्टोबरपासून आदिवासी बांधवांनी मुलभूत सोयी अभावी पुनर्वसित गाव सोडून मुळ गावी कमकासुरात धाव घेतली आहे.
राहुल भुतांगे।
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : ५ आॅक्टोबरपासून आदिवासी बांधवांनी मुलभूत सोयी अभावी पुनर्वसित गाव सोडून मुळ गावी कमकासुरात धाव घेतली आहे. सुरुवातीला प्रशासनाने आदिवासी बांधवांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले आहे. दरम्यान जलसमाधी व काळी दिवाळीचा इशारा देताच लवकरच सोयी सुविधा पुरवा, आदिवासी बांधवांनी पुनर्वसित गावात परत जावे असे जिल्हा प्रशासनाने माध्यमातून सांगितले. परंतु तीच माहिती स्वत: येऊन सांगायला जिल्हा प्रशासन आले नाही.
कमकासुरात दिवाळीच्या दिवशी शासन व प्रशासनाचे प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून काळोखात व उघड्यावर चटणीभात खाऊन काळी दिवाळी साजरी केली. मात्र बधीर प्रशासनाला जाग आली नाही.
मध्य प्रदेश तथा महाराष्ट्र या दोन राज्याच्या मधोमध बावनथडी नदी वाहते.याच नदीवर बावनथडी सिंचन प्रकल्प पूर्णत्वास आला आहे. या प्रकल्पाच्या गळभरणीच्या वेळेस बुडीत क्षेत्रात येत असलेल्या कमकासुर येथील आदिवासी बांधवांना बंदुकीच्या धाकावर गावातून हाकलून लावण्यात आले. त्यांचे पुनर्वसन रामपूर येथे करण्यात आले. मात्र पाच वर्षापासून त्या ठिकाणी १८ नागरी मूलभूत सुविधा पुरविल्या गेल्या नव्हत्या. परिणामी अनेकदा निवेदने देऊन समस्या दूर करण्याची मागणी करण्यात आली. परंतु प्रशासनाने आदिवासी बांधवांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. अखेरीस ५ आॅक्टोबर रोजी सर्व आदिवासी बांधव लेकराबाळासह रामपूर पुनर्वसित गाव सोडून स्वगावी परतले. कमकासूर हे बुडीत गाव असल्याने त्याठिकाणी आता दलदल निर्माण झाली आहे.
माणसाएवढी झुडपी वाढलेली आहे. परिसरात दाट जंगल असून या ठिकाणी जंगली व हिंस्त्र प्राण्याचा वावर आहे. सापांचा अधिवास त्या ठिकाणी आहे. तरीसुद्धा जोपर्यंत मुलभूत सुविधा पुरविण्यात येत नाही तोपर्यंत कमकासूरातच राहू अशी भूमिका घेत आदिवासींनी तंबूत संसार सुरु केला. दरम्यान आदिवासी बांधवांच्या आंदोलनाने उग्ररुप धारण करताच जिल्हाधिकाºयांनी पुनर्वसीत गाव रामपूर येथे मुलभूत सुविधा पुरविण्याचे आदेश संबंधित विभागाला दिल्याचे सांगून आदिवासी बांधवांनी पुनर्वसीत गावात परत जाण्याचे आवाहन केले. परंतु प्रत्यक्षात कमकासूरातील परिस्थिती जाणून घेण्याची व आदिवासी बांधवांना समजविण्याची तसदी घेतली नाही. जिल्हाधिकाºयांनी जसे प्रसार माध्यमातून आदिवासी बांधवांना आवाहन केले. त्याच प्रकारे कमकासुरात प्रत्यक्ष भेट देऊन त्यांना पुनर्वसीत गावात जाण्यासाठी सांगितले असते तर कदाचित आदिवासी बांधवांनी आपल्या चिमुकल्यासह दिवाळी साजरी केली असती. परंतु तसे काही झाले नाही. आतातरी जिल्हाधिकाºयांनी आदिवासी बांधवांचे गºहाणे ऐकून त्यांची मरणयातनेतून मुक्तता करावी ही त्यांची अपेक्षा आहे.
आदिवासी बांधव हा सहनशील आहे. प्रशासनाला वेळ हवा की आणखी काही हवे ते त्यांनी येथे येऊन प्रश्न सोडविला असता तर सुलभ झाले असते. आमची हीच मागणी होती.
- अशोक उईके, आदिवासी नेता
प्रसार माध्यमातून जिल्हाधिकाºयांनी पुनर्वसनाबाबतच्या दिलेल्या आकडेवारीत व प्रत्यक्ष आकडेवारीत तफावत आहे. तसे पुरावेही आहेत.
- किशोर उईके, सरपंच कमकासूर
आदिवासी आपल्या लेकराबाळांसह कोणत्या परिस्थितीत राहतात हे पाहल्यावर त्यांना कळेल. दिवाळी सारख्या सणात आम्ही आमच्या घरात नाही. यापेक्षा दुसरे दु:ख कोणते.
- लक्ष्मी खंडाते, कमकासूर.